Sangli Municipal Election 2026: कवलापूर विमानतळ, रिंग रोड अन् आयटी पार्कसह विकासकामांचा संकल्प; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:29 IST2026-01-12T17:27:42+5:302026-01-12T17:29:20+5:30
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Sangli Municipal Election 2026: कवलापूर विमानतळ, रिंग रोड अन् आयटी पार्कसह विकासकामांचा संकल्प; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध
सांगली : सांगली आणि कुपवाडला वारणा नदीतून शुद्ध पाणी, कवलापूर येथे विमानतळाची उभारणी, ई-बस सेवा, रिंग रोड आणि आयटी पार्क, मिरजेत जागतिक दर्जाचा संगीत प्रकल्प, असा महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचा संकल्प असलेला जाहीरनामा भारतीय जनता पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आला.
आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, पक्षाचे नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर, केदार खाडिलकर यावेळी उपस्थित होते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर जाहीरनाम्यातील सर्व आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी या सर्व नेत्यांनी दिली.
वाचा : मिरजेची दुर्दशा किती दिवस सहन करणार, विनय कोरे यांचा सवाल
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्यांमध्ये सांगली शहराची महापुराच्या संकटातून सुटका, सर्व औद्योगिक वसाहतींना पंचतारांकित सुविधा, नमामि कृष्णा योजना, महापालिका क्षेत्रात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वतंत्र वाहतूक आराखडा, तीनही शहरांत अत्याधुनिक भाजी मंडई, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, मिरजेत वैद्यकीय केंद्र आणि पर्यटनाला चालना, अत्याधुनिक व्यापारी संकुल, झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत,
मध्यवर्ती निदान केंद्र, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका, कुपवाडमध्ये भुयारी गटार योजना, नागरिकांना सुसह्य आणि सुटसुटीत अशी घरपट्टी आकारणी, निर्यात सुविधा केंद्र, केंद्रीय हळद बोर्डाची शाखा व बेदाणा संशोधन केंद्र, अद्यावत ट्रक टर्मिनल, क्रीडांगणाचा विकास मलशुद्धीकरण प्रकल्प आदी योजनांचा समावेश आहे.