Sangli Municipal Election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये जागा वाटपावर होईना एकमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:58 IST2025-12-29T18:57:04+5:302025-12-29T18:58:58+5:30
आघाडीच्या हालचाली सुरूच; रविवारी दिवसभर खलबते

Sangli Municipal Election 2026: सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी- काँग्रेसमध्ये जागा वाटपावर होईना एकमत
सांगली : महाविकास आघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची आघाडी करण्याबाबतचा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पण, जागा वाटपाबाबत एकमत होत नसल्याने चर्चा पुन्हा लांबली आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उद्धवसेना) पक्षाच्या नेत्यांचे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत रविवारी दिवसभर खलबते सुरू होते. सांगलीवाडीतील प्रभाग १३, सांगलीतील प्रभाग क्रमांक १५, १६ व मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेस व शरद पवार पक्षामध्ये चुरस निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात महाविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (उद्धवसेना) एकत्र आली आहे. तर मतांची विभागणी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार) यांना एकत्र घेण्यासाठी महाविकास आघाडी करून प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, माजी खा. संजयकाका पाटील यांनी आ. विश्वजीत कदम व आ. जयंत पाटील यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केली. पण काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या जागा वगळून राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच, सहा, सात व वीस तर सांगलीतील प्रभाग क्रमांक १८ या पाच प्रभागांतील केवळ एकच जागा महाविकास आघाडीला मिळेल. इतर जागांवर तडजोड शक्य नाही. शिवाय सांगलीतील काही जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची अडचण निर्माण झाली आहे. यावर चर्चा पुढे सरकली नाही. रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धवसेना) गटाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात दिवसभर चर्चा सुरू होत्या.
सांगली येथील प्रभाग क्रमांक १५, १६ या दोन्ही प्रभागांतील प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला हवी आहे. पण, या ठिकाणी काँग्रेसचे इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या जागांची तडतोड झालेली नाही. तर मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच व सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये देखील दोन्ही पक्षात चुरस निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात चर्चा सुरू होती. यावर सोमवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (उद्धवसेना) मतदार असलेल्या पाच ते सहा जागांवर उमेदवारी देण्याबाबत एकमत करण्याचे सुरू होते. यावर सोमवारी (उद्या) अंतिम निर्णय होणार आहे.