Sangli Municipal Election 2026: भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:44 IST2025-12-30T15:43:37+5:302025-12-30T15:44:39+5:30
आता आमची ताकद दाखवूनच देऊ

Sangli Municipal Election 2026: भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई
सांगली : महापालिका निवडणुकीत भाजपने आमचा मान- सन्मान ठेवला नाही. राज्यात सर्व ठिकाणी भाजप व शिंदेसेनेची युती असताना सांगलीत मात्र ‘अंडरइस्टिमेट’ केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागात आमचे उमेदवार उभे करणार आहे. निवडणूक ताकदीने लढून आमची ताकद नक्कीच दाखवून देऊ, असा इशारा पर्यटनमंत्री तथा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी दिला.
महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी (अजित पवार) गट बाहेर पडल्यानंतर शिंदेसेनेबरोबरची जागा वाटपाची चर्चा फिस्कटली आहे. महापालिकेत भाजने शिंदेसेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी सर्व प्रभागातील ७८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती.
वाचा : सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
या पार्श्वभूमीवर सोमवारी शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलवर बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीबाबत जोरदार चर्चा झाली. आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, सुनीता मोरे, शहरप्रमुख सचिन कांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.
देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणूक भाजपबरोबर लढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. आम्हाला जागा वाटपात योग्य सन्मान मिळावा अशी आमची मागणी होती. जागा वाटपात तडजोड करण्याची तयारी आम्ही दर्शवली होती. मात्र भाजपने आमचा मान-सन्मान ठेवला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी आमची युती तुटली.
मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. आम्ही कार्यकर्त्याला लढायला शिकवले आहे. त्यामुळे आता थांबणार नाही. स्वबळावर सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. प्रचारात पूर्ण वेळ देणार आहे. भाजपने आम्हाला बेदखल केल्यामुळे त्यांना ताकद दाखविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत भाजप व महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.