Sangli: शिक्षक नसल्याने मिरजेत संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे, विद्यार्थी रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:37 IST2025-06-20T18:37:19+5:302025-06-20T18:37:42+5:30

महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Angry parents block school in Miraj Sangli due to lack of teachers | Sangli: शिक्षक नसल्याने मिरजेत संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे, विद्यार्थी रस्त्यावर 

Sangli: शिक्षक नसल्याने मिरजेत संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे, विद्यार्थी रस्त्यावर 

मिरज : मिरजेत इंदिरानगर येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसायची वेळ आली आहे. १३५ विद्यार्थी असलेल्या शाळेत एकच शिक्षक असल्याने संतप्त पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकून आंदोलन केले.

महापालिका शाळा क्रमांक २२ मध्ये पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवत आहेत. शाळेमध्ये शिपायाची नेमणूक नसल्याने शिक्षकच शाळेची साफसफाई करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षातही या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाला नसल्याने पालकांनी व मुलांनी शाळेबाहेर बसून आंदोलन केले.

महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. पालकांनी शाळेत आणखी शिक्षक नेमण्याची लेखी मागणी शिक्षण विभागाकडे वारंवार केली आहे. मात्र, या मागणीची महापालिकेने दखल घेतलेली नाही. इंदिरानगर मागासवर्गीय वसाहतीतील ही महापालिकेची एकमेव शाळा असून आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही, असा प्रश्न संतप्त पालकांनी केला.

शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. शाळेचे व्यवस्थापन अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असून शाळेत स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. या शाळेत किमान पाच शिक्षकांची गरज असून शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी व पालकांच्या आंदोलनामुळे महापालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी तेथे आले.

विद्यार्थी बहुसंख्य पण, शिक्षक नाहीत

शाळेत आणखी शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेच्या अनेक शाळांत शिक्षक आहेत, परंतु विद्यार्थी नाहीत. मात्र या शाळेत विद्यार्थी बहुसंख्य असताना शिक्षक नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Angry parents block school in Miraj Sangli due to lack of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.