जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:28 IST2025-03-13T15:27:46+5:302025-03-13T15:28:03+5:30
वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यापुढेही टोकाच्या संघर्षाचे राजकारण चालेल याचे संकेत मिळत आहेत.

जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!
युनूस शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जिवाला लागला आहे.राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडीमुळे ज्या नेतृत्वाने गेली ३५ वर्षे अन्यायाचे, घराघरात फूट पाडण्याचे, कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचे काम केले. त्या नेतृत्वाचा व माझा अनेकवेळा टोकाचा संघर्ष झाला.तेच नेतृत्व भाजपाच्या नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड करत असेल, भाजपा प्रवेशाची स्वप्ने पाहात असेल तर स्वाभिमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहून यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करू," असा निर्णय सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार यांच्या मेळाव्यात जाहीर केला.
इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात स्वाभिमानी मतदार ,भाजपा पदाधिकारी,कार्यकार्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी निशिकांत भोसले-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते व उरूण इस्लामपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक एल.एन.शहा होते.
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या कथित भाजपा प्रवेशाच्या चर्चा झडत असताना मतदारसंघातील त्यांचे प्रबळ विरोधक मानले गेलेल्या निशिकांत भोसले-पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अगदी थोडक्या मताने पराभवाला सामोरे गेल्यावर निशिकांत पाटील हे कोणती भूमिका घेणार याची चर्चा होत होती. शेवटी त्यांनी आ.जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाची चाल ओळखून अजित पवार यांच्यासोबत राहात यापुढेही जयंत पाटील यांच्यासाठी तगड्या विरोधाची मानसिकता बाळगल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांचा जयंत पाटील विरोधी सूर लक्षात घेत निशिकांत पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यामुळे वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यापुढेही टोकाच्या संघर्षाचे राजकारण चालेल याचे संकेत मिळत आहेत.
खरेच कुणकुण लागली का..?
निशिकांत पाटील हे भाजपाच्या मोठ्या सत्ता वर्तुळातील वरिष्ठ नेतृत्वासोबत वावर असणारे नेते म्हणून परिचित होते. त्यामुळे कदाचित त्यांना आ. जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाची खात्रीलायक कुणकुण लागली आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसोबतच्या मेळाव्यात अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.