लिंबू पाणी हा अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतो. काही जण सकाळी उठल्यावर गरम लिंबू पाणी पितात, तर उन्हाळ्यात अनेकांना गार लिंबू पाणी प्यायला आवडतं. दोन्ही पेयं शरीरासाठी फायदेशीर असली तरी त्यांचे उपयोग आणि शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो. (Should you drink lemon water hot or cold? Both have different benefits, )त्यामुळे कोणत्या वेळी कोणतं लिंबू पाणी प्यावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
गरम लिंबू पाणी प्रामुख्याने सकाळी रिकाम्या पोटी पिण्याची सवय अनेक जण लावतात. कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीराला हायड्रेशन मिळतं आणि रात्रीभरानंतर शरीराला ताजेतवाने वाटू शकतं. काही लोकांना यामुळे पोट हलकं राहण्यास मदत होते. सकाळी कोमट पाणी घेतल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळू शकते, त्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास कमी जाणवतो. तसेच गरम लिंबू पाणी घेतल्यावर काहींना घसा आरामदायक वाटतो, विशेषतः थंडी किंवा सौम्य घशातील खवखव असेल तर.
अनेकदा वजन कमी करण्यासाठी गरम लिंबू पाण्याचा उल्लेख केला जातो, पण फक्त हे पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होतं असा दावा पूर्णपणे खरा नाही. मात्र साखरयुक्त पेयांऐवजी हे पेय घेतल्यास कॅलरी कमी प्रमाणात शरीरात जातात, त्यामुळे अप्रत्यक्ष फायदा होतो. शिवाय पचनासाठी लिंबू चांगले.
दुसरीकडे, गार लिंबू पाणी हे विशेषतः उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतं. उन्हामुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार बाहेर पडतात. अशावेळी लिंबू सरबत प्यायल्याने शरीराला पाणी मिळतं आणि थकवा कमी जाणवू शकतो. साखर ऊर्जा देते. मात्र वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा नाही. उन्हातून आल्यावर गार लिंबू पाणी घेतल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि फ्रेश वाटतं. साखर हवीच असे नाही.
लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी शरीरासाठी उपयुक्त असतं. त्यामुळे गरम असो किंवा गार, दोन्ही प्रकारचं लिंबू पाणी रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतं. मात्र खूप जास्त साखर घालून बनवलेलं लिंबू सरबत नियमित पिणं टाळावं. त्याऐवजी कमी साखर, सैंधव मीठ किंवा थोडा गूळ वापरल्यास पेय अधिक चांगलं ठरू शकतं.
तसंच, खूप गरम पाण्यात लिंबू टाकू नये. अतिगरम पाण्यामुळे लिंबातील काही पोषक घटक कमी होण्याची शक्यता असते. कोमट पाणी हा अधिक योग्य पर्याय मानला जातो. एकूणच पाहिलं तर सकाळी पचन आणि हलकं वाटण्यासाठी गरम लिंबू पाणी उपयोगी ठरू शकतं, तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी गार लिंबू पाणी अधिक फायदेशीर ठरतं. शरीराची गरज, हवामान आणि वेळ यानुसार दोन्ही पेयं योग्य प्रमाणात घेतली तर त्याचा आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो.
