खास समारंभ, वाढदिवस किंवा विकेंडचा बेत, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर अनेकांची पहिली पसंती असते काजू मसाला. काजूची शाही चव आणि भाजीच्या ग्रेव्हीतील मसल्यांचा खमंग सुगंध यामुळेच ही भाजी चवीला अप्रतिम लागते.(Shahi Kaju Masala gravy secret) अनेकदा घरी हॉटेलसारखी चव, तो दाटपणा आणि क्रीमी पोत मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. पण फक्त ३० मिनिटांत अस्सल रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार करू शकता.(Best Kaju Masala recipe in Marathi)
ही शाही भाजी आपण अगदी घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून बनवू शकतो. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या काजू मसाला भाजीसारखीच चव आणि टेक्स्चर घरच्या बनवलेल्या भाजीला देण्यासाठी सोपी रेसिपी पाहूयात. रेस्टॉरंटस्टाईल काजू मसाला भाजी घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहूयात. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
दह्यावर पाण्याचा तरंग- चवीलाही आंबट? विरजण लावण्यासाठी ४ टिप्स- मिळेल घट्ट कवडीसारखे पांढरेशुभ्र दही
साहित्य
कांदे - ३ मोठे
टोमॅटो - १
कोथिंबीरीचे देठ - ४ ते ५
काजू - २० ते २५
आलं - १ इंच
लसूण पाकळ्या - ६ ते ७
बटर - ३ चमचे
तेल - ४ ते ५ चमचे
जिरे - अर्धा चमचा
खडा मसाला
मीठ - चवीनुसार
हळद - अर्धा चमचा
तिखट - २ चमचे
धणे पूड - अर्धा चमचा
गरम मसाला - अर्धा चमचा
गरम पाणी - १ कप
कसुरी मेथी - १ चमचा
फ्रेश क्रीम- ३ चमचे
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात कांद्याचे, टोमॅटोचे तुकडे करुन घ्या. आता एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात कांद्याचे, टोमॅटोचे तुकडे, कोथिंबीरीची देठ, मीठ, ५ ते ६ काजू घालून ५ मिनिटे उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात आले आणि लसूण घाला.
2. मिक्सरच्या भांड्यात उकळवलेले सर्व साहित्य वाटून त्याची पेस्ट तयार करा. कढईमध्ये तेल तापवून त्यात उरलेले काजू हलके लालसर होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्याच कढईत बटर घाला.
3. आता यात जिरे, खडा मसाला, मीठ घालून परतवून घ्या. त्यात वाटलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परता. मग त्यात हळद, तिखट, धणे पूड, गरम मसाला घालून 2-3 मिनिटे परता.
4. त्यात वरुन गरम पाणी घालून झाकण ठेवून १० मिनिटे शिजू द्या. त्यात तळलेले काजू, कुटलेली कसुरी मेथी, फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणखी 2-3 मिनिटे शिजवा. गरमागरम नान, रोटी, चपाती किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा.
