उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येक घराघरात आंबा खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. उन्हाळ्यात प्रत्येक घरोघरी आंब्याची पेटी मोठ्या हौसेनं आणली जाते. यातील काही आंबे असेच खाऊन फस्त केले जातात तर काही आंब्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. आंब्याचे विविध पदार्थ घरातील प्रत्येकालाच आवडतात. त्यातच आंब्याचा गोड पल्प आणि ताज्या ओल्या खोबऱ्यापासून तयार केलेल्या मऊसूत वड्या हा एक असा पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणतो(Mango Coconut Barfi Recipe).
सण-समारंभ असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी, दुपारच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची आपली जुनी परंपरा आहे. आणि विषय जर आंब्याचा असेल, तर खवय्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही...आंब्याचा रसाळ पल्प आणि ओल्या खोबऱ्याच्या गोड, मऊसूत वड्या म्हणजे साक्षात स्वर्गसुख! ओल्या नारळाची चव आणि आंब्याचा शाही सुवास एकत्र आल्यावर जी मिठाई तयार होते, तिच्यासमोर काजू कतली आणि महागडे पेढेही फिके वाटू लागतात. तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊ वडी घरातल्या लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात. आंब्याची नैसर्गिक गोडी आणि ओल्या खोबऱ्याचा खमंग स्वाद यांचा अप्रतिम संगम या वड्यांना खास चव देतो. विशेष म्हणजे हा पदार्थ घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतो. घरातील बच्चेकंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खुश करण्यासाठी आंब्याची ही मऊसूत वडी ( how to make Mango Coconut Barfi at home) एक परफेक्ट गोड पदार्थ आहे. पाक न बनवता, तासंतास गॅससमोर न उभे राहता, अगदी हॉटेलसारखी परफेक्ट मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी आंब्याची वडी (Amba Narlachi Barfi Recipe) घरच्या घरी कशी बनवायची? याची साधीसोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. ओलं खोबरं - १ कप (किसलेलं किंवा तुकडे केलेलं)
२. आंब्याच्या फोडी - १ कप (२ मध्यम आंबे तुकडे केलेले)
३. साखर - १ कप
४. दुधावरील साय - १/२ कप
२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओलं खोबरं घालावं मग त्यातच चवीनुसार साखर आणि आंब्याचे छोटे तुकडे देखील घालावेत.
२. सगळं मिश्रण एकत्रित मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यावं.
३. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण पॅनमध्ये ओतून ते मंद आचेवर सतत हलवत व्यवस्थितीत शिजवून घ्यावं.
४. या मिश्रणामध्ये दुधावरील साय घालून सगळ मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
अधिक मास विशेष : वाणाचे अनारसे जमतील परफेक्ट लक्षात ठेवा ५ टिप्स, खुसखुशीत अनारसे करा घरीच...
५. मिश्रणाला तेल सुटून ते मिश्रण कढईच्या कढा सोडू लागलं की ते शिजलं आहे असं समजावं.
६. एका मोठ्या कडा असलेल्या डिशला थोडंसं तेल लावून ते व्यवस्थित पसरवून घ्यावे, मग या डिशमध्ये तयार मिश्रण घालून ते चमच्याने दाब देत व्यवस्थित थापून घ्यावं. मिश्रण थोडं हलकसर कोमट असतानाच सुरीच्या मदतीने वड्या पाडून घ्याव्यात.
आंब्याचा पल्प आणि ओल्या खोबऱ्याच्या गोड, मऊसूत वड्या खाण्यासाठी तयार आहेत.
