फ्रेंच फ्राईज म्हणजे लहान मुलांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषयच. एकदा केले की पाच मिनिटांत फस्त होतात. तरी अजून आहेत का अशी विचारणी होतेच. लहान मुलंच नाही सगळेच हा पदार्थ आवडीने खातात. शिवाय करायलाही अगदी सोपे आहेत. (Make cafe-like french fries at home, tasty and easy recipes)पण घरी केलेले विकतसारखे कुरकुरीत का होत नाहीत ? अगदी सोपं गणित आहे. काही शुल्लक चुकांमुळे फ्राईज चामट होतात.
सुरुवात बटाटा निवडण्यापासून करायची. बटाटे सोलताना सगळंच काढून टाकू नका. फक्त अगदी वरची साल नीट निघेल एवढीच काढा. सोलल्यानंतर लगेच बटाटे पाण्यात टाका, नाही तर ते काळे होतात. मीठ पाण्यात बटाटे १५ ते २० मिनिटे ठेवायचे. आता बटाट्याचे तुकडे करण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. फ्रेंच फ्राईज साधारण एकसारख्या जाडीचे कापा. फार पातळ कापले तर पटकन जळतात आणि फार जाड असतील तर आतून शिजायला वेळ लागतो. सगळे तुकडे जवळजवळ सारखे असतील, तर तळताना सगळे एकसारखे तळले जातात. जळत नाहीत आणि मस्त लागतात.
बटाटा सोलून झाल्यावर किमान अर्धा तास थंड पाण्यात ठेवा. यामुळे त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जातो आणि फ्राईज खुसखुशीत होतात. पाणी एक-दोन वेळा बदला आणि शेवटी बटाटे हाताने चोळून स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर हे खूप महत्त्वाचे आहे की बटाटे पूर्ण कोरडे करा. स्वच्छ कापडावर पसरवून ठेवा किंवा टिश्यूने नीट पुसा. ओलसर बटाटे तळले तर तेल उडते आणि फ्राईज कुरकुरीत होत नाहीत, चामट होतात. विकतसारखे का होत नाहीत असा प्रश्न पडतो ना? विकतचे फ्राईज डबल फ्राय केलेले असतात. एकदा अर्धवट तळून काढले की पुन्हा एकदा तळायचे. तरच ते एक्सट्रा क्रिस्पी होतात.
रंग छान सोनेरी झाला की लगेच काढा. जास्त वेळ तळत ठेवल्यास फ्राईज कडक होतात. जर अगदी फास्ट-फूडसारखी चव हवी असेल, तर तळण्याआधी कोरड्या बटाट्याला अगदी थोडे कॉर्नफ्लाअर किंवा तांदळाचे पीठ लावा. जास्त नाही अगदी कोटींग पुरतं. यामुळे फ्राईज अजूनच खुसखुशीत होतात. या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर घरी केलेले फ्रेंच फ्राईज दिसायलाही छान आणि खायला अगदी विकत सारखेच लागतात. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि गरमागरम फ्राईज खाण्याची मजा वेगळीच असते.
