आजकाल केक, मिठाया, आइस्क्रीम किंवा विविध पदार्थ अधिक आकर्षक दिसावेत म्हणून खाण्याचे रंग वापरण्याची पद्धत वाढली आहे. रंगीत पदार्थ पाहिले की ते खावेसे वाटतात. विशेषतः लहान मुलांना ते लगेच आवडतात. (Is it okay to use food colour? is it bad for health ? learn about it, healthcare tips )मात्र 'खाण्याचा रंग वापरावा का?' हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं नसून, तो कसा आणि किती वापरतो यावर सगळं अवलंबून असतं.
खाण्यासाठी वापरले जाणारे रंग हे विशेषतः अन्नासाठी वापरण्याआधी तपासणी केले जातात (food-grade). योग्य प्रमाणात वापरल्यास ते सामान्यतः सुरक्षित मानले जातात. पण जास्त प्रमाणात किंवा वारंवार वापरल्यास काही लोकांना अॅलर्जी, पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांच्या अन्नामध्ये कृत्रिम रंगांचा जास्त वापर टाळावा, कारण त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम लवकर दिसू शकतो.
रंग वापरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रकार निवडणं. बाजारात मिळणारे सर्व रंग खाण्यासाठी योग्य असतीलच असं नाही. त्यामुळे नेहमी food-grade असा उल्लेख असलेले, विश्वासार्ह ब्रँडचे रंगच वापरावेत. औद्योगिक किंवा कपड्यांचे रंग कधीही अन्नात वापरू नयेत, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. खाण्यचा रंग पूर्णपणे वेगळा मिळतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण. रंगाचा वापर नेहमी अगदी कमी प्रमाणात करावा. फक्त दिसण्यासाठी थोडासा रंग पुरेसा असतो, जास्त रंग घातल्यास पदार्थ कृत्रिम दिसतोच, शिवाय तो शरीरासाठीही चांगला नसतो. त्याची चवही कडू लागते. विशेषतः गडद रंग तयार करताना जास्त प्रमाण वापरण्याची गरज भासते, त्यामुळे अशावेळी अधिक सावध राहणं आवश्यक आहे. रंग पाण्यात मिक्स करुन मगच वापरावा. असाच पदार्थात घालू नये.
तिसरं म्हणजे शक्य असेल तेव्हा नैसर्गिक रंगांचा वापर करणे हा उत्तम पर्याय आहे. उदाहरणार्थ, बीटापासून लाल रंग, हळदीपासून पिवळा, पालकापासून हिरवा रंग सहज मिळू शकतो. हे रंग केवळ सुरक्षितच नाहीत, तर त्यातून थोडंफार पोषणही मिळतं. घरच्या घरी तयार केलेले नैसर्गिक रंग मुलांसाठी अधिक योग्य ठरतात.
तसेच, रंग वापरताना स्वच्छता आणि साठवणूक याकडेही लक्ष द्यावं. रंग ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि त्यांची एक्सपायरी डेट तपासूनच वापरावेत. जुने किंवा खराब झालेले रंग वापरणं टाळावं. एकूणच, खाण्याचे रंग पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण त्यांचा वापर मर्यादित आणि योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच पदार्थात रंग असला काय नसला काय त्याचा चवीवर परिणाम होत नाही.
