उन्हाळा आला की कैरीची आंबट-गोड चव चाखल्याशिवाय मनाचे समाधानच होत नाही. या सीझनमध्ये कैरीपासून तयार केलेल्या पारंपरिक पन्ह्याचा आस्वाद तर आपण सगळेच घेतोच, पण त्यालाच थोडा ट्विस्ट देऊन जर त्याची कँडी आईस्क्रीम किंवा पॉप्सिकल्स तयार केले, तर मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते आवडतील. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना रोज काहीतरी नवीन हवं असतं? मग बाहेरच्या महागड्या आणि अनहेल्दी कँडी, आईस्क्रीमला म्हणा नको...घरच्याघरी कमी साहित्यांत आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे कैरीच्या पन्ह्याचे पॉप्सिकल्स हे उकाड्यात आपल्याला रिफ्रेश करणारा परफेक्ट पदार्थ आहे. कैरीच्या पन्ह्यापासून बनवलेली ही चटपटीत पॉप्सिकल केवळ ५ मिनिटांत अगदी झटपट तयार करु शकता. कैरीचं पन्हं, काळं मीठ आणि जिरे पूड यांचा वापर करून बनवलेली ही कँडी खाताना तुम्हाला 'आईस्क्रीम' आणि 'पन्हं' अशा दोन्हीचा आनंद मिळेल(Aam Panna Popsicle Recipe).
बाजारात मिळणारी रंगीत आईस्क्रीम किंवा केमिकलयुक्त कँडी खाण्यापेक्षा यंदा घरीच तयार करा 'नॅचरल इलेक्ट्रोलाईट बुस्टर'! कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यातील आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. पण तेच पन्हं जेव्हा एका थंडगार पॉप्सिकलच्या स्वरूपात समोर येतं, तेव्हा त्याची चव अजूनच वाढते. कैरीचा आंबटपणा, गुळाचा गोडवा आणि पुदिन्याचा ताजेपणा असलेल्या या 'कैरी पन्हं कँडी'मुळे शरीराला थंडावा तर मिळेलच, पण तुमची इम्युनिटीही वाढेल. लहानपणीच्या त्या 'आंबट-गोड' आठवणींना उजाळा देणारा हा खास पदार्थ तुमच्या उन्हाळ्याची मजा द्विगुणित करेल. घरच्याघरीच कैरीच्या पन्ह्याचे पॉप्सिकल (Kairichya Panhyachi Ice Candy Recipe) तयार करण्याची इन्स्टंट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कैरीचं पन्हं - २ ते ३
२. पाणी - १ कप
३. पुदिन्याची पाने - १/२ कप (बारीक चिरलेली)
४. काळं मीठ - चवीनुसार
५. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
६. मध किंवा गूळ - १ ते २ टेबलस्पून
७. चाट मसाला - चिमूटभर
८. लाल तिखट मसाला - चिमूटभर
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये कैरीचं पन्हं, पाणी, काळं मीठ आणि जिरेपूड एकत्र करा. सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होण्यासाठी मिश्रण चमच्याने हलवून घ्यावं.
२. तयार मिश्रणाची चव चाखून पाहा आणि जर जास्तच आंबट वाटत असेल, तर त्यात थोडे चवीनुसार मध किंवा गूळ घाला.
फिटनेस फ्रिक अक्षयकुमारला आवडते ‘तसे’ करा मँगो आइस्क्रिम, मनसोक्त खाऊनही वजन वाढणार नाही...
३. या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली पुदिन्याची पाने मिक्स करा, ज्यामुळे पॉप्सिकलच्या प्रत्येक थराला एक सुंदर हिरवा रंग आणि सुगंधी चव येईल.
४. हे मिश्रण पॉप्सिकल मोल्डमध्ये ओता, त्यामध्ये स्टिक्स व्यवस्थित लावा आणि किमान सहा ते आठ तास किंवा पूर्णपणे गोठून त्याची आईस्क्रीम होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.
कैरीच्या पन्ह्याचे मस्त आंबट - गोड चवीचे पॉप्सिकल म्हणजेच कँडी आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. साच्यातून हे पॉप्सिकल स्टिक्स बाहेर काढल्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर थोडा चाट मसाला, लाल तिखट भुरभुरवून मग खाऊ शकता, यामुळे पॉप्सिकलची चव दुपटीने वाढेल.
