Shocking! Dowry persecution even during lockdown: embezzlement of Rs 22 lakh; Married woman commits suicide in Thane | धक्कादायक! लॉकडाऊनच्या काळातही हुंडयासाठी छळ: २२ लाखांचा अपहार; सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या

पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देपतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हाचितळसर पोलीस ठाण्यात नोंदविली मुलीच्या आईने तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: माहेरुन आर्थिक मदतीसाठी व दागिन्यांसाठी सतत होत असलेल्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून निशा विकास बगाडीया (३६, रा. पोखरण रोड क्र. २, ठाणे) हिने रहात्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी पती विकास बगाडीया, सासरे विश्वनाथ आणि सासू शकुतलादेवी यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात निशा हिच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २४ एप्रिल २०१२ रोजी निशा आणि विकास यांचे लग्न झाल्यापासून ते २७ एप्रिल २०२० या सात वर्षांच्या कालावधीमध्ये माहेरुन आर्थिक मदतीसाठी रोख आणि दागिन्यांची वेळोवेळी निशाकडे मागणी करण्यात येत होती. शिवाय, घरातील किरकोळ कारणावरुनही तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता. यासाठी तिला अनेकदा शिवीगाळ, मारहाण करुन दमदाटी करुन आत्महत्या करण्यास भाग पडेल अशा प्रकारे वर्तन करुन अत्यंत क्रूरप्रकारे तिचा छळ केला जात होता. लग्नाच्या खर्चासाठीही ४० लाखांची मागणी केली होती. ते न दिल्यास लग्न होणार नाही असे सुनावण्यात आले होते.लग्नासाठी ३६ लाखांचा खर्च करुन मुलगी आणि जावई यांना सुमारे १२ लाखांचे दागिनेही देण्यात आले. मात्र, कार आणि लॅपटॉपची मागणी पूर्ण न केल्यामुळे निशाचा वारंवार छळ केला जात होता. अखेर खर्च करुनही कमी खर्च का केला अशी तिला विचारणा केली जात होती. त्यानंतर मुलीच्या सासऱ्यांकडे निशाच्या माहेरच्या लोकांनी पाच लाखांची रोकडही दिली. नोटबंदीच्या काळातही जावई विकास आणि व्याही विश्वनाथ यांंनी व्यवसायासाठी १५ लाखांची रोकड घेतली. तरीही तिचा छळ कमी झालाच नाही. उठाबशा काढण्यास सांगणे, शारिरिक संबंधास नकार दिला म्हणून बेदम मारहाण करणे, टोमणे मारणे शिवाय गाडीसाठीही तिच्याकडे पाच लाखांच्या पैशांची मागणी करीत होते. तरीही आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, अशी मुलीची समजूत घालून लॉकडाऊननंतर पैशांची तजविज करु, असेही सासरच्या मंडळींना सांगण्यात आले. मात्र, पतीसह सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास असहय झाल्याने निशाने २७ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक दोन येथील आशर रेसिडेन्सीमधील बगाडीया कुटूंब वास्तव्याला असलेल्या मोनार्च इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. मुलीला वेळोवेळी दिलेले सोने चांदीच्या दागिन्यांचा तसेच २२ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उषा सराफ यांनी चितळसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येत असून चौकशीअंती सासरच्या मंडळींना अटक केली जाईल, अशी माहिती चितळरसर पोलिसांनी दिली.

 

Web Title: Shocking! Dowry persecution even during lockdown: embezzlement of Rs 22 lakh; Married woman commits suicide in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.