Khari Biscuit Review | Khari Biscuit Review: कुरकरीत नसलेली खारी-बिस्कीट
Khari Biscuit Review: कुरकरीत नसलेली खारी-बिस्कीट
Release Date: November 01,2019Language: मराठी
Cast: वेदश्री खाडिलकर,अथर्व कदम, संजय नार्वेकर,सुशांत शेलार,नंदीता पाटकर
Producer: झी स्टुडिओज Director: संजय जाधव
Duration: 1 तास 46 मिनीटंGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देखारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते.

लहान मुलांच्या नातेसंबंधांवर आत्तापर्यंत मराठीत बरेच सिनेमे आलेले आहेत. त्यातले काही सिनेमे आपल्याला भावलेही मात्र काही सिनेमांनी मात्र घोर निराशाच केलेली आहे. असाच भावा बहिणीच्या भावनिक नातेसंबंधांवर  खारी-बिस्कीट हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचे ट्रेलर पाहून यातील मुलांची कामं पाहून अपेक्षित असा सिनेमा पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र एखादा पदार्थ बनवताना कुक जरी चांगला असला, तो पदार्थ बनवण्यासाठी योग्य रेसिपी जरी असली तरी पदार्थ तयार करताना या सगळ्याचे योग्य प्रमाण जर घेतलं नाही तर तो पदार्थ बेचव होतो. खारी -बिस्कीटचंही थोडंसं तसंच झालंय. कथानक उत्तम, दिग्दर्शकही उत्तम,बॅनर उत्तम, कलाकारही उत्तम मात्र कथानक तोकडं पडल्याने हे  खारी-बिस्कीट कुरकरीत नाही तर नरम झालंय. खारी बिस्कीटचं कथानक काहीसं असं आहे. ही कथा सुरू होते फेब्रुवारी २०११ पासून .हे ते २०११ साल जेव्हा भारताने तब्बल २८ वर्षांनंतर मुंबईतच क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. सचिन तेंडुलकरचा खेळाडू म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप होता. तर दुसरीकडे खारी (वेदश्री खाडिलकर) आणि बिस्कीट ( अथर्व कदम) ही बहिण भावाची जोडी आणि त्यांची कहाणी. खारी जन्मापासूनच हे जग आपल्या डोळ््याने पाहू शकत नाही. मात्र खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिच्या प्रत्येक स्वप्नाला खरं करुन दाखवणं हेच जणू बिस्कीटच्या जगण्याचं कारण आहे . त्यासाठी तो खारीची प्रत्येक इच्छा कितीही कठीण आणि अशक्य वाटत असली तरी प्रत्यक्षात उतरवत असतो. फूटपाथच्या बाजूला राहूनही, रोजच्या जीवणमरणाचा ,खाण्यापिण्याचा प्रश्न असूनही बिस्कीट आपल्या खारीला खोटंही खरं करून भासविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा असतो. तितक्यात भारतात २०११ क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर सुरू होतो. खारी जे म्हणते ते सत्य होत असतं अशी आख्यायिका . त्यामुळेच खारीला आता हा क्रिकेट वर्ल्डकप पाहण्याची इच्छा होते. आता राजकुमारी खारीची इच्छा तिचा लाडका भाऊ बिस्कीट नाही पूर्ण करणार असं होणार नाही. त्यासाठी बिस्कीट आणि त्याची छोटयांची गँग रक्ताचे पाणी करतात. आता ते त्यात यशस्वी होतात का ? खारीला वर्ल्डकपची मॅच पाहायला मिळते का ? बिस्कीट आपल्या खारीला खूष करतो का ? हे पाहण्यासाठी तुम्हांला सिनेमा पाहायला हवा. 

 

मुळात एक कल्पना म्हणून ही कथा अतिशय उत्तम आहे. ज्याचा २०११ च्या क्रिकेट वर्ल्डकपशी जोडलेला संबंधही एक कल्पना म्हणून ठीक आहे. संजय जाधव हे निष्णात सिनेमॅटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा तांत्रिकदृष्टया दिसायलाही सुंदर आहे. सिनेमाचं टेकिंग,एडिटींग,संगीतही छान आहे. पण तांत्रिकदृष्ट्या सिनेमा नुसताच छान दिसून उपयोग नाही. याला लागणाºया कथेत मात्र त्रूटी आहेत. आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यावर याच्या सादरीकरणात कमकुवतपणा जाणवत जातो. खारीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फूटपाथच्या बाजूला राहूनही बंगल्यात राहतो, विमानाने प्रवास करतो, शाहरूख,सलमान खान यांच्या डुप्लिकेटसना आणून त्यांना खरेखुरे खान भासवणे आणि ते खारीने खरे समजणे हे त्याअर्थी पटत नाही. मुळातच ही कल्पना कथेत आणि नंतर स्क्रीनप्ले आणि संवादामध्ये तितकशी उतरवण्यात दिग्दर्शकाला आणि सहाय्यकांना अपयश वाटलंय. इतकी गरीब परिस्थिती असताना बिस्कीट सारख्या ८ वर्षीय मुलाला सगळं कसं झटपट मिळत राहणं हे एकवेळ काल्पनिक आपण समजू शकतो मात्र त्याचा भडिमार व्हायला लागला की ते कंटाळवाणं वाटतं. 

 

सिनेमाचे दोन मुख्य प्रवाह खारी आणि बिस्कीट . वेदश्री खाडिलकर आणि अथर्व कदम या दोनही बालकलाकारांचा हा पहिलाच सिनेमा. मात्र या दोनही मुलांची अभिनयाची समज चांगली आहे. त्यांनी केलेली मेहनतही कळतेय मात्र कथेत फार करण्यासारखं नसल्याने त्यांना दिग्दर्शकाने जे सांगितलंय त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं आहे. पण त्यांची अभिनयाची उंची अजून मोेठी आहे. नंदीता पाटकर,संजय नार्वेकर, सुशांत शेलार ,सुयश झुंझरके यांनी छोट्या छोट्या भूमिकेत उत्तम कामं केली आहेत. पंकज पडघनचं संगीतही उत्तम जमलंय . सिनेमा तांत्रिकदृष्ट्या नुसता उत्तम असून उपयोग नाही सिनेमाला उत्तम कथेची आणि सादरीकरणाची जोड नसेल तर समोर फक्कड चहा जरी असला तरी त्यात बुडवून खायची खारी-बिस्कीट तितकी कुरकरीत नक्कीच असावी. 

Web Title: Khari Biscuit Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.