Choricha Mamla Review: खळखळून हसवणारा "चोरीचा मामला"

By अजय परचुरे | Published: January 30, 2020 02:57 PM2020-01-30T14:57:58+5:302023-10-02T13:24:28+5:30

अतिशय खळखळून हसवणारा आणि शेवटपर्यंत उत्कंठा ताणत ठेवणारा चोरीचा मामला हा सिनेमा सिनेरसिकांसाठी एक मेजवानी आहे.

Choricha Mamla Review | Choricha Mamla Review: खळखळून हसवणारा "चोरीचा मामला"

Choricha Mamla Review: खळखळून हसवणारा "चोरीचा मामला"

ठळक मुद्देया सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ठय म्हणजे यात येणारा अगदी फ्रेश विनोद.
Release Date: January 31,2020Language: मराठी
Cast: जितेंद्र जोशी,अमृता खानविलकर,हेमंत ढोमे,क्षिती जोग,अनिकेत विश्वासराव,किर्ती पेंढारकर
Producer: स्वरुप स्टुडिओजDirector: प्रियदर्शन जाधव
Duration: २ तास १४ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

मराठीत विनोदी सिनेमांची लाट ही नेहमीच येत असते. पण त्यातील अनेक सिनेमे पाहिल्यानंतर हे विनोदी सिनेमे आहेत ? असं म्हणण्याची वेळ येते. इतका यातील विनोद निर्बुध्द, अकारण आणलेला आणि ओढून ताणून आणल्यासारखा असतो. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या दुकलीने आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्ष अस्सल विनोद लोकांपर्यंत पोहचवला होता. त्यानंतर हे प्रमाण कमी झाले. नंतर भरत जाधव , मकरंद अनासपुरे या दुकलीने आपला विनोदाचा एक वेगळाच ट्रेंड मराठीमध्ये सेट केला होता. मात्र या दुकलीचे सिनेमेही कमी व्हायला लागल्यावर विनोदाची जणू पोकळीच निर्माण झाली होती. मात्र सध्या मराठी सिनेमात कथेच्या जोरावर एक सरळसोप्पी पण तितकीच प्रभावी विनोदी सिनेमा करणारा लेखक -दिग्दर्शक मिळाला आहे प्रियदर्शन जाधव. मस्का या त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या दिर्ग्दशनातून दर्शनने आपलं अस्तित्व मराठी सिनेजगताला दाखवून दिलं होतं. आणि त्यावर कळस चढवत चोरीचा मामला या सिनेमातून प्रियदर्शनने खऱ्या अर्थाने विनोदाचे चौकार -षटकार मारले आहेत. मस्कामध्ये एका घटनेभोवती गुंफणारं कथानक प्रियदर्शनने लीलया उभारलं होतं. चोरीचा मामलामध्येही दर्शनने अश्याच प्रकारचं एक धमाल कथानक मांडलं आहे.  एक सरळसाधा आणि सरळमार्गी असणारा नंदन (जितेंद्र जोशी) त्याचं चौकौनी कुटुंब दोन मुली आणि लाडाची बायको आशा (कीर्ती पेंढारकर) . तर दुसरीकडे राजकारणी तरणाबांड गडी अमरजित पाटील ( हेमंत ढोमे) आपली राजकीय कारर्किद बाजूला ठेवून श्रध्दा ( अमृता खानविलकर) नावाच्या स्वताचा गाण्याचा अल्बम काढू  इच्छिणाऱ्या गायिकेच्या रूपावर भाळला आहे. अमरजित पाटील श्रध्दाला घेऊन त्याच्या फार्महाऊसला जातो. तिकडे आधीच सरळसाधा नंदन चोरी करण्यासाठी आलेला असतो. काही कारणास्तव नंदन तिकडेच अडकून पडतो आणि फार्महाऊसवर अमरजित आणि आशाच्या तावडीत सापडतो. आपण दिल्लीला कामासाठी जातोय असं अमरजितने आपली बायको अंजली पाटील (क्षिती जोग) ला खोटं सांगितलेलं असतं. त्यावर पाळत ठेवण्यासाठी अंजली पोलिस इन्सपेक्टर अभिनंदन ( अनिकेत विश्वासराव) ला कामाला लावते. फार्म हाऊसमध्ये अमरजित,आशाची नंदनशी होत असलेली गडबड, त्यात नवऱ्याच्या पाठीपाठी फार्महाऊसवर आलेली अंजली पाटील हिच्यामुळे या गोंधळात अजून वाढ होते. या सगळ्या सावळ्यागोंधळात निरनिराळ्या अडचणी येत असतात. आणि यातून मार्ग काढताना यातील प्रत्येकाची भंबेरी उडत असते. एकापासून वाचण्यासाठी यातील प्रत्येक जण एकमेकांशी खोटं बोलण्याचे इमले रचतो.यामुळे कश्या अडचणी येतात, कसा गोंधळ उडतो आणि यातून शेवटी कसा मार्ग निघतो याचं धमाल चित्रण म्हणजे चोरीचा मामला. 

या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ठय म्हणजे यात येणारा अगदी फ्रेश विनोद. गेले कित्येक वर्ष रंगभूमीवर एक विनोदी अभिनेता म्हणून काम करणारा प्रियदर्शन जाधव , अभिनयाव्यतिरिक्त दर्शन हा एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे हे त्याच्या मस्का आणि चोरीचा मामला या सिनेमांवरून स्पष्ट झालं आहे. रंगभूमीवर प्रकाश बुध्दिसागर या चतुरस्त्र दिग्दर्शकाच्या नंतर जर कोणी अशा प्रकारची विनोदी संहिता रंगवली असेल तर त्याचं श्रेय प्रियदर्शन जाधवला नक्की जातं. फर्मास संवाद, उगाचच ओढून ताणून विनोद न करता फुलवलेला अप्रतिम प्लॉट हे या सिनेमाचं वैशिष्ठय आहे . सिनेमाचा वेग पहिल्या हाफमध्ये जरी सुरवातीला थोडा कमी असला तरी एकदा फार्महाऊसवरचं कथानक सुरू होतो तेव्हा या सिनेमाचा खरा वेग सुरू होतो. आणि हा वेग आणि त्यातील विनोद आपल्याला खळखळून हसवत राहतो. हे श्रेय दर्शनचं आहे. कुठेही सिनेमा बाष्कळ विनोदात अडकू न देता, तसेच कोणतीच स्लॅपस्टीक कॉमेडी न करता साधा सरळ सोपा विनोद चेहऱ्यावरच्या हावभावातून व्यक्त करण्याची हातोटी दर्शनने अचूक साधली आहे. हे या सिनेमाचं वेगळेपण आहे. 

या सिनेमाचं अजून एक वेगळेपण म्हणजे या सिनेमाची अतिशय तंतोतंत निवडलेली स्टारकास्ट.. या सिनेमाचा प्राण आहे जितेंद्र जोशी नंदनच्या भूमिकेत जितेंद्रने धमाल उडवून दिलीय.. साधाभोळा नंदन साकारताना त्याने चेहºयावर आणलेला साधेपणा, आपण पकडले गेलोय हे कळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उडलेली भंबेरी, अचूक टायमिंग साधत केलेले पंचेस याच्या जोरावर जितेंद्रने हा सिनेमा अतिशय तोलून धरला आहे. श्रध्दाच्या भूमिकेत अमृता खानविलकरनेही कमाल केली आहे. विनोदाचे हुकमी एक्के सोबत असताना अमृताने श्रध्दाच्या भूमिकेत असलेला वेडेपणा अतिशय उत्तम साकारला आहे. अंजलीच्या भूमिकेतील क्षिती जोगने पाटलीण बाईचा दरारा आपल्या हुकमी पंचेस आणि हावभावातून अतिशय फर्मास उभा केला आहे. अनिकेत विश्वासराव, किर्ती पेंढारकर, रमेश वाणी यांनी छोट्या छोट्या भूमिकेतही मजा केली आहे. मात्र या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज आहे अभिनेता हेमंत ढोमे . जितेंद्र जोशीच्या खांद्याला खांदा लावून हेमंतने साकारलेला अमरजित पाटील तुम्हांला पोट धरेपर्यंत हसवतो. हेमंत ढोमे तसा विनोदातही लाऊड आर्टिस्ट आत्तापर्यंत त्याच्या भूमिकांमुळे मानला जायचा मात्र चोरीचा मामला मधील अमरजित पाटील हेमंतने अतिशय संयतपणे पण अचूक टायमिंगच्या जोरावर साकारला आहे. हेमंत असलेल्या प्रत्येक सीनमध्ये आपण खळखळून हसतो हे त्याच्या अभिनयाचं कौतुक आहे. .. एकंदरीतच हा सिनेमा एक मस्त फक्कड विनोदाची डीश आहे जी तुम्ही एकदा नक्कीच चाखून पाहायला हवी. 


 


 

Web Title: Choricha Mamla Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.