31 Divas marathi review : एक प्रेरणादायी गोष्ट

By प्राजक्ता चिटणीस | Published: July 20, 2018 08:00 AM2018-07-20T08:00:00+5:302024-02-09T13:05:01+5:30

31 दिवस या मराठी चित्रपटात शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रिना अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

31 Divas marathi review : Inspiration Story | 31 Divas marathi review : एक प्रेरणादायी गोष्ट

31 Divas marathi review : एक प्रेरणादायी गोष्ट

Release Date: July 20,2018Language: मराठी
Cast: शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रिना अग्रवाल
Producer: भारथन सुरेश बाबूDirector: आशिष भेलकर
Duration: 2 तास 15 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

आयुष्यात अप अँड डाऊन कधी येतील हे कोणची सांगू शकत नाही. अनेकवेळा सगळे काही सुरळीत सुरू असते. सगळी स्वप्नं पूर्ण होत असतात. त्यामुळे आता आयुष्यात काहीच चिंता करायची गरज नाही असेच वाटत असते. पण अचानक त्या स्वप्नांना ब्रेक लागतो आणि सगळी स्वप्न धुळीस मिळतात. असेच काहीसे 31 दिवस या चित्रपटातील नायकासोबत घडते. 
मकरंद (शशांक केतकर) ची मोठा दिग्दर्शक बनण्याची इच्छा असते आणि त्या दिशेने त्याचे प्रयत्न देखील सुरू असतात. याच दरम्यान मुग्धा (मयुरी देशमुख) त्याच्या आयुष्यात येते. ते दोघे लग्न करतात. मुग्धा नोकरी करत असते तर दुसरीकडे मकरंदचा स्ट्रगल सुरू असतो. एका मालिकेच्या सेटवर तो कॉच्युम डिझायनरचा असिस्टंट म्हणून काम करत असतो. पण काही केल्या या कामात त्याचे मन रमत नसते. एकेदिवशी मालिकेच्या सेटवर दिग्दर्शक उशिराने आल्याने या मालिकेची निर्माती प्रचंड भडकते. मकरंद दिग्दर्शन करू शकतो असे तिला त्याच्या बोलण्यातून जाणवते आणि ती त्याला मालिकेचे दिग्दर्शन करण्याची संधी देते. तिथून त्याचे नशिबच पालटते. त्यानंतर त्याला एक चित्रपट देखील दिग्दर्शित करायला मिळतो. आपण आपली सगळी स्वप्नं लवकरच पूर्ण करणार असे त्याला वाटत असतानाच एका चित्रीकरणाच्या दरम्यान त्याचा अपघात होतो आणि त्याची दृष्टी जाते. अंधत्व आल्याने मकरंद चांगलाच निराश होतो. पण त्याची पत्नी, त्याचे मित्र आणि मीरा ही त्याची एक जुनी मैत्रीण त्याच्या पाठिशी उभी राहाते. मीराला देखील एका अपघाताने अंधत्व आलेले असते. पण असे असूनही ती एखाद्या सामान्य व्यक्तिप्रमाणे आपले जीवन जगत असते. ती अंध मुलांच्या शाळेत मुख्यध्यापिका असते. ती त्याला आवाजाची, पावलाची मदत घेऊन दैनंदिन व्यवहार करण्याचे शिकवते. मीरा आणि मुग्धाच्या मदतीने तो आपली स्वप्नं पूर्ण करतो का? त्याच्या आयुष्यात पुढे काय काय घडते? यशस्वी दिग्दर्शक व्हायचे त्याचे स्वप्न पूर्ण होते का? हे आपल्याला 31 दिवस या चित्रपटात पाहायला मिळते.
31 दिवस या चित्रपटात नायकाचा दाखवलेला संघर्ष हा खरंच प्रेरणादायी आहे. पण चित्रपटात अनेक गोष्टी उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. तसेच केवळ 31 दिवसात त्याने केलेल्या काही गोष्टी या अतिशयोक्ती वाटतात. चित्रपटाचा शेवट तर ओढूनताणून केल्यासारखाच वाटतो. तसेच चित्रपटाचा कालावधीदेखील अधिक असल्याने चित्रपट काहीसा कंटाळवाणा होतो. या चित्रपटात शशांक दिग्दर्शक असलेला आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. तो एका चित्रपटाचे चित्रीकरण काश्मिरमध्ये करतो असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण हे चित्रीकरण काश्मीर येथे झालेले नसून स्टुडिओतच झाले आहे. केवळ बँकराऊंड बदललेले आहे असे चित्रपट पाहाताना लगेचच कळते. त्यामुळे सिनेमेटोग्राफीवर अधिक मेहनत घेण्याची गरज होती. पण चित्रपटात शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रिना अग्रवाल यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्यांनी हा चित्रपट त्यांच्या अभिनयाच्या जोरावर उचलून धरला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. चित्रपटातील गाणी अनेक नयनरम्य ठिकाणी चित्रीत करण्यात आली आहेत. पण ती गाणी तितकीशी ओठावर रुळत नाहीत. 

Web Title: 31 Divas marathi review : Inspiration Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.