Total Dhamaal Movie Review | Total Dhamaal Movie Review : निव्वळ मनोरंजन करणारा 'टोटल धमाल'
Total Dhamaal Movie Review : निव्वळ मनोरंजन करणारा 'टोटल धमाल'
Release Date: February 22,2019Language: हिंदी
Cast: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, मनोज पाहवा, पिताबेश त्रिपाठी, विजय पाटकर व बोमण ईराणी
Producer: इंद्र कुमार, अशोक ठकेरियाDirector: इंद्र कुमार
Duration: २ तास १० मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

गुप्त धन आणि ते मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये सुरू असलेली कारस्थानं, चढाओढ व मारामारी यावर आधारीत बरेच चित्रपट येऊन गेलेत. मात्र हाच विषय विनोदी आणि तोही अ‍ॅडव्हेंचरस पद्धतीने मांडण्यांचे धाडस दिग्दर्शक इंद्र कुमारने केले आहे. 'टोटल धमाल' हा धमाल फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील तगडी स्टारकास्ट पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि आज ती अखेर संपली आहे.

चित्रपटाची कथा गुड्डू (अजय देवगण), पिंटू (मनोज पाहवा) आणि जॉ़नी (संजय मिश्रा) यांच्याभोवती फिरते. अचानक एकेदिवशी पिंटूला कोटींचा खजिना सापडतो. गुड्डू आणि जॉनीला फसवून पिंटू हे पैसे कुठेतरी लपवितो. गुड्डू आणि जॉनी एक दिवस पिंटूला शोधत असतात. त्याच दरम्यान एका अपघातात पिंटूचा मृत्यू होतो. मृत्यूच्या वेळी तो या गुप्त धनाबद्दल अविनाश (अनिल कपूर), बिंदू (माधुरी दीक्षित), लल्लन (रितेश देशमुख), झिंगुर (पिताबेश त्रिपाठी), आदित्य (अर्शद वारसी) व मानव (जावेद जाफरी) यांना सांगतो. त्याच दरम्यान गुड्डू आणि जॉनदेखील तिथे पोहचतात. त्यामुळे त्यांना देखील गुप्त धनाबद्दल समजते. मग, गुप्त धन मिळवण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होते. हे गुप्त धनापर्यंत हे लोक कसे पोहचतात व हे गुप्तधन कोणाला मिळते की नाही, हे जाणून घेण्यासाठी 'टोटल धमाल' पहावा लागेल. 

'धमाल', 'डबल धमाल' या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडतो. विनोदी अंदाजात सिनेमा सादर करण्याच्या फंद्यात चित्रपटाचे कथानक फसलेले जाणवते. चित्रपटाचा पूर्वाध पात्रांची ओळख करून देण्यातच घालवला आहे. मात्र उत्तरार्धात चित्रपट वेगाने पुढे सरकतो. पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध जास्त मनोरंजक वाटतो. या चित्रपटात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, मनोज पाहवा, पिताबेश त्रिपाठी, विजय पाटकर व बोमण ईराणी या कलाकारांनी विनोदाचा अचूक टाईम साधत खूप चांगला अभिनय केला आहे. तगडी स्टारकास्ट असतानादेखील दिग्दर्शकाला याचा फारसा फायदा करून घेता आला नसल्याचे चित्रपट पाहताना वारंवार जाणवते. तब्बल सतरा वर्षानंतर अनिल कपूर व माधुरी दीक्षित यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे रसिकांसाठी सोने पे सुहागा आहे असेच म्हणावे लागेल. तसेच सोनाक्षी सिन्हा 'मुंगडा' या गाण्यातून भलतीच भाव खाऊन गेली आहे. कलाकारांचा अभिनय आणि मेंदूला जास्त ताण न देता फक्त मनोरंजनासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

Web Title: Total Dhamaal Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.