Section 375 Movie Review : खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन ३७५'

By तेजल गावडे | Published: September 13, 2019 02:21 PM2019-09-13T14:21:32+5:302023-08-08T20:09:54+5:30

बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत.

Section 375 Movie Review | Section 375 Movie Review : खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन ३७५'

Section 375 Movie Review : खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन ३७५'

Release Date: September 13,2019Language: हिंदी
Cast: अक्षय खन्ना, रिचा चड्ढा, राहुल भट व मीरा चोप्रा
Producer: कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि एससीआईपीएल Director: अजय बहल
Duration: २ तास ०४ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

 

- तेजल गावडे

देशभरात बलात्कार व लैंगिक शोषणाबद्दल दररोज ऐकायला व वाचायला मिळत असतं. तसंच मागील वर्षी बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेनं जोर धरला होता. या मोहिमेअंतर्गत सिनेइंडस्ट्रीतील महिलांनी लैंगिक शोषण व अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. तसंच दिल्ली येथील २०१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून सेक्शन३७५चे वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत.

'सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे.  या चित्रपटाच्या कथेची सुरूवात सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक रोहन खुराना (राहुल भट) त्याच्या चित्रपटासाठी काम करणारी ज्युनिअर असिस्टंट कॉश्च्युम डिझायनर अंजली डांगळे (मीरा चोप्रा)वर झालेल्या बलात्कारापासून होते. त्यानंतर सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात रोहन खुराना (राहुल भट) ला दोषी करार करत १० वर्षांची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात जाते. वकील तरूण सलूजा (अक्षय खन्ना) आरोपीच्या बाजूनं आणि पीडितेच्या बाजूने सरकारी वकील हिरल गांधी (रिचा चड्ढा) हे प्रकरण लढवत असते. त्यानंतर कोर्टात साक्षीदार, पोलिसांचा हलगर्जीपणा आणि व्यवस्थेतील ढिसाळ कारभार रेखाटण्यात आला आहे. अंजली डांगळेला न्याय मिळतो की नाही आणि रोहन खुरानाला दोषी करार केलं जातं की नाही, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.


चित्रपटात कथा दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच सरळ मार्गाने कायदेशीर कारवाई किती त्रस्त आणि मानसिक त्रास देणारी असते, हे देखील यात दाखवण्यात आलं आहे. भ्रष्टाचार व कायदेशीर तपासातील दिरंगाई चित्रपटात वास्तविक टच देतो. चित्रपटाचा उत्तरार्ध थक्क करणारा आहे आणि चित्रपटातील कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. दिग्दर्शक अजय बहलने बलात्कारासारखा मुद्दा अगदी सोप्या पद्धतीने सादर केला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्याने साकारलेला हायफाय वकील रसिकांच्या मनावर छाप उमटवून जातो. तर रिचा चड्ढानेदेखील तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे आणि ती अक्षयसमोर कुठेही कमकुवत वाटत नाही. तसेच या चित्रपटातील सहकलाकार राहुल भट व मीरा चोप्रा यांनी देखील त्यांची भूमिका चांगली वठवली आहे. तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट परिपूर्ण करण्यासाठी सिनेमॅटोग्राफर व एडिटरनेदेखील चांगली किमया साधली आहे. चित्रपटातील संवादही खूप चांगले आहेत. कानून न्याय नहीं है यह सिर्फ उसे पाने का एक हथियार है यांसारखे चित्रपटातील डायलॉग्स आपल्याला विचार करायला भाग पाडतात. दमदार स्क्रीप्ट व अभिनय असलेला हा चित्रपट एण्टरटेनिंगदेखील आहे. त्यामुळे कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. त्यामुळे 'सेक्शन ३७५' बद्दल जाणून घेण्यासाठी आणि कोर्टरूम ड्रामा अनुभवण्यासाठी थिएटरच्या कोर्टाला आवर्जुन भेट द्या.

Web Title: Section 375 Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.