Marjaavaan Movie Review : Brilliant performance by Riteish Deshmukh | Marjaavaan Movie Review : रितेशच्या अभिनयाला उंची देणारा मरजावाँ

Marjaavaan Movie Review : रितेशच्या अभिनयाला उंची देणारा मरजावाँ

Release Date: November 15,2019Language: हिंदी
Cast: सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया, रकुल प्रीत सिंग आणि रितेश देशमुख
Producer: भुषण कुमार, कृष्णन कुमार, दिव्या खोसला कुमार, मोनिषा अडवाणी, मधू भोजवानी, निखिल अडवाणीDirector: मिलाप झवेरी
Duration: 135 मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्देएकंदरीत सिद्धार्थ, रितेश यांच्या अभिनयासाठी, ॲक्शन सीनसाठी आणि या चित्रपटातील गाण्यांसाठी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

ऐंशी-नव्वदीच्या दशकात अनेक ॲक्शनपट सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. याच धर्तीवर मरजावाँ हा चित्रपट बनवण्यात आला असून खूप सारी ॲक्शन, लांबलचक संवाद, इमोशनल ड्रामा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतो.रघू (सिद्धार्थ मल्होत्रा) या अनाथ मुलाला अण्णा (नासर) या गुंडाने लहानाचे मोठे केलेले असते. त्यामुळे तो या अण्णासाठी काम करत असतो. अण्णादेखील आपल्या मुलाप्रमाणेच त्याचा सांभाळ करत असतो. पण अण्णाचा मुलगा विष्णूला (रितेश देशमुख) रघुचा राग येत असतो. रघूला कमीपणा दाखवण्याची एकही संधी तो सोडत नसतो. त्याचदरम्यान झोया (तारा सुतारिया) रघुच्या आयुष्यात येते. तिच्यामुळे रघु खूप बदलतो. रघु झोयात गुंतला असल्याचे विष्णूच्या लक्षात आल्याने तो त्या गोष्टीचा फायदा घेतो आणि रघूवर अशी वेळ आणतो की, तोच झोयाचा खून करतो. त्यानंतर पुढे काय होते हे प्रेक्षकांना मरजावाँ या चित्रपटात पाहायला मिळते.मरजावाँ या चित्रपटाच्या प्रेमकथेत नावीन्य नाहीये. केवळ नायक नायिकेचा खून करतो ही एकच वेगळी गोष्ट आपल्याला चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत केवळ व्यक्तिरेखांची ओळख, रघू-झोया प्रेमकथा, विष्णू-रघूची दुश्मनी याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मध्यांतराच्याआधी रघू झोयाचा खून करतो. त्यामुळे मध्यांतर एका रंजक गोष्टीवर होत असला तरी पुढे काय होणार याची कल्पना आधीच येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता राहात नाही. चित्रपटाची रुंदी देखील मोठी असल्याने काही वेळा चित्रपट कंटाळवाणा होतो. तसेच रघू आणि झोया यांची केमिस्ट्री तितकीसी जुळून आली नसल्याने त्यांच्या प्रेमकथेत आपण गुंतले जात नाही. सिद्धार्थ मल्होत्राने पहिल्यांदाच अँग्री मॅनची भूमिका साकारली असली तरी या भूमिकेला त्याने योग्य न्याय दिला आहे. तारा सुतारिया आणि रकुल प्रीत सिंग यांच्या व्यक्तिरेखा मांडण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे. ताराला चित्रपटात मुकी का दाखवण्यात आले आहे हेच कळत नाही. चित्रपटात खरी बाजी मारली आहे ती, रितेश देशमुखने. त्याने या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. अनेक दृश्यांमध्ये रितेशच्या कमी उंचीचा खूपच चांगल्याप्रकारे दिग्दर्शकाने वापर करून घेतला आहे.  ढाई किलो का हात नही तो देढ किलो का दिमाग है, जुम्मे की रात है... बदले की बात है.... अल्लाह बचाए मुझे तेरे वार से, मैं मारूँगा मर जायेगा... दोबारा जन्म लेने से डर जाएँगा यांसारखे या चित्रपटातील संवाद हे जुन्या चित्रपटातील संवादातून, अथवा गाण्यातून प्रेरित होऊन लिहिले गेले आहेत हे चित्रपट पाहाताना लगेचच जाणवते. चित्रपटात अनेक लांबलचक संवाद असल्यामुळे ते खूपच ड्रॅमेटिक वाटतात. पण चित्रपटातील तुम ही आना, थोडी जगाह ही गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. तसेच एक तो कम जिंदगानी, हैय्या हो, किन्ना सोना ही गाणी देखील मस्त जमून आली आहेत. पण काही दृश्यांमध्ये गाणी उगाचच टाकल्यासारखी वाटतात. ऐंशी-नव्वदीच्या चित्रपटाचा मरजावाँ या चित्रपटावर इतका प्रभाव आहे की, त्रिशूलमध्ये अमिताभ बच्चन गुंडाना मारताना ज्याप्रकारे सोबत ॲम्बुलन्स घेऊन जातात, त्याचप्रमाणे रघू गुंडाना मारताना प्रथमोपचाराची पेटी सोबत घेऊन जातो. एकंदरीत सिद्धार्थ, रितेश यांच्या अभिनयासाठी, ॲक्शन सीनसाठी आणि या चित्रपटातील गाण्यांसाठी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

Web Title: Marjaavaan Movie Review : Brilliant performance by Riteish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.