"अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर..."; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:05 IST2024-04-18T16:04:20+5:302024-04-18T16:05:52+5:30
"महाराष्ट्रात ४५+ जागा घेऊनच महायुती जिंकेल", अलिबागमध्ये महायुतीच्या विराट सभेत फुंकले रणशिंग

"अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर..."; सुनिल तटकरेंचे टीकास्त्र
Sunil Tatkare vs Anant Geete, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५+ जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आज गतिमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे, त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असेही तटकरे म्हणाले. रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या विराट जाहीर सभेतून सुनिल तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
अनंत गीते यांच्यावर टीका
"लोकसभेची निवडणूक ही जगाच्या पाठीवरचे देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची काम होत आहे. अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती, तर त्यांचा निकाल तेव्हाच लागला असता. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे आपल्याला काम करण्याची गीतेंना संधी मिळाली. मात्र आपण गीते यांचे एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. एका गोष्टीचे वाईट वाटते, पत्रकार मित्रांनी गीतेंना प्रश्न विचारला की, कोरोना, चक्रीवादळ या संकटात तुम्ही कुठे होता? त्यावेळी ते हसत होते. नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असतो, हे माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा पाहायला मिळाले," अशी खंत सुनिल तटकरेंनी व्यक्त केली.
निवडून आल्यावर सुनील तटकरे काय करणार?
निवडून आल्यावर मी येणारी पाच वर्षे महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघांमध्ये येण्याची वाट पाहत होत्या. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर या योजना आपल्याकडे आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे", असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.
३२ #रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, मनसे महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला.
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 18, 2024
यावेळी मा.ना. रविंद्रजी चव्हाण , शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र दळवी, धैर्यशील पाटील, तसेच महायुतीचे पदाधिकारी… pic.twitter.com/wRDLRWQRpn
"काही वेळेला समाजात धर्माच्या नावाने संभ्रम निर्माण केला जातो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये किरकोळ नाही तर मागच्यापेक्षा मोठ्या फरकाने आपल्याला यश मिळेल. पुढची पाच वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत न चुकता घड्याळाचे बटण दाबा आणि प्रचंड मतांनी विजयी करा", असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.