वारंवार पक्ष बदलणाऱ्या गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 20:17 IST2025-08-01T20:15:55+5:302025-08-01T20:17:14+5:30
ज्यांनी अजित पवारांना ‘गद्दार’ आणि ‘संपलेले’ असे जाहीरपणे संबोधले, अशा व्यक्तींना पक्षात पुन्हा प्रवेश देणे कितपत योग्य आहे

वारंवार पक्ष बदलणाऱ्या गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल
दौंड: माजी आमदार रमेश थोरात यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरवंड येथे जाहीर सभेत अधिकृत प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजित पवारांना उद्देशून एक खुले पत्र प्रसारित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रात थोरात यांच्या प्रवेशावर आणि पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
पत्रात कार्यकर्त्यांनी थेट विचारले आहे, ‘ज्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना ‘गद्दार’ आणि ‘संपलेले’ असे जाहीरपणे संबोधले, अशा व्यक्तींना पक्षात पुन्हा प्रवेश देणे कितपत योग्य आहे?’ कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, काही नेते स्वतःच्या पुत्रप्रेमासाठी आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील स्वार्थासाठी वारंवार पक्ष बदलतात. ‘अशा नेत्यांना पुन्हा गळ्यात माळ घालणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाची आणि पक्षशिस्तीची थट्टा आहे’, असे पत्रात नमूद आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे, ‘जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक निवडणुकांसाठी अशा नेत्यांचा उपयोग होतो, पण निवडणुका संपल्यानंतर हे नेते पुन्हा दुसऱ्या पक्षात जातात. मग अशा लोकांना वारंवार प्रवेश देऊन पक्षाची बदनामी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान का केला जातो?’ कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला अशा ‘घटकसंधी’ प्रवेशांना आळा घालण्याची मागणी केली आहे.
रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश आणि राजकीय पार्श्वभूमी
रमेश थोरात यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून दौंड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे दौंड तालुक्यात अजित पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. परंतु, त्याचवेळी पक्षांतर्गत असंतोषही पृष्ठभागावर आला आहे.
कार्यकर्त्यांचा असंतोष आणि पक्षांतर्गत आव्हान
या खुल्या पत्रामुळे अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्थानिक नेते अशा वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज असल्याचे समजते. ‘निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली, पण अशा नेत्यांना पुन्हा संधी देऊन त्यांचा अवमान होत आहे’, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया अपेक्षित
या पत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोरात यांचा पक्षप्रवेश हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीतीचा भाग असला, तरी कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पक्ष नेतृत्वासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.