वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले; बिडकरांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की, ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:19 IST2026-01-12T15:18:06+5:302026-01-12T15:19:57+5:30
आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारले, शिवीगाळ केली तसेच गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले; बिडकरांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की, ५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : मंगळवार पेठेतील वजनकाटा परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना गर्दीचा फायदा घेत भाजपचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आदित्य दीपक कांबळे (२४, रा. सदानंदनगर, सलोखा मंडळाजवळ, मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मंगळवार पेठेतील वजनकाटा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तेथे गेले होते. याच वेळी भाजप तसेच आरपीआयचे कार्यकर्ते एकाच वेळी आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. दरम्यान, त्यावेळी आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारले, शिवीगाळ केली. यावेळी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गर्दी करून गोंधळ घालणे व मारामारीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले करत आहेत.