Video: 'इच्छुक असतानाही मला डावललं', भाजपच्या बंडखोर माजी नगरसेवकाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:26 IST2025-12-29T17:25:34+5:302025-12-29T17:26:20+5:30
भाजपचे माजी नगरसेवक पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते

Video: 'इच्छुक असतानाही मला डावललं', भाजपच्या बंडखोर माजी नगरसेवकाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे: भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळालं नसल्याने नाराज झालेल्या एका माजी नगरसेवकांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गाठलं. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. धनंजय जाधव हे प्रभाग क्रमांक २७ मधून इच्छुक होते. मात्र पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या जाधव यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. विशेष म्हणजे, जाधव हे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते. आता त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.
जाधव म्हणाले, मी २०१७ पासून कुठलंही पद नसताना पक्षासाठी काम करत होतो. वेगवेगळे उपक्रम पक्षाच्या वतीने घेतले. मी इच्छुक असतानाही मला आज डावललं गेलं आहे. ज्या व्यक्तीला आमच्या प्रभागातून तिकीट देण्यात आले आहे. ती कधीही मिटिंगला, पक्षात दिसत नाही. मी एवढा सक्रिय असूनही त्यांनी माझा विचार केला नाही. आमच्या पर्वती प्रभागातून मला लोकांसाठी काम करायचं आहे. म्हणून मी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
पुण्यात भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याने पक्षाने थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत भाजपने पहिली यादी जाहीर केली. मात्र पुण्यात यादी न जाहीर करता थेट एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपने ही शक्कल लढवली आहे. असे करूनही पहिलीच बंडखोरी भाजपमधून झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आज उद्या बंडखोरी रोखण्याचे पक्षासमोर आव्हानच असणार आहे.