“माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपाला दाखवतील, निवडणूक एकतर्फी...”: वसंत मोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:24 IST2024-03-19T13:20:35+5:302024-03-19T13:24:17+5:30
Vasant More News: महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या दिवशी रिंगणात उतरेन, त्या दिवशी लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल, असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.

“माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपाला दाखवतील, निवडणूक एकतर्फी...”: वसंत मोरे
Vasant More News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षांनी जागावाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी आणि जागावाटपावरून अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात असून, वसंत मोरे यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, आजपासून निवडणुकीला ५५ दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू. माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन, असे वसंत मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
मी योग्य ट्रॅकवरच, यशस्वी होईन
महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीत, तर जिंकायच्याही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईन असे मला वाटते. पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेत आहोत. लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात. पण ते निवडताना पुण्याचे हित झाले पाहिजे त्या दृष्टीने पावले टाकतो, असे मोरे म्हणाले.
माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपाला दाखवतील
वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले, तर त्याने आम्हाला फारसा फरक पडणार नाही, असे विधान भाजपा नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर, तसा फरक पडला नसता तर २०२२ ला ते मला म्हणालेच नसते की, तुम्ही भाजपात या. मॅरिएट हॉटेलमध्ये मला पुरस्कार दिला होता. तेव्हा उघडपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते की तुम्ही भाजपात या, तुम्ही निवडून याल. मी तेव्हाच त्यांना सांगितले की माझ्या तिन्ही टर्म भाजपाविरोधात झाल्या आहेत आणि तिन्ही वेळा मी यशस्वी झालो आहे. त्यामुळे माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवतील, असे आव्हानच वसंत मोरे यांनी दिले.