दुसरा पर्यायच ठेवला नाही; पक्षहितासाठीच अपक्ष लढलो, निलंबन त्वरित मागे घ्यावे, बागुल यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:28 IST2024-12-11T10:27:33+5:302024-12-11T10:28:04+5:30
पर्वती मतदार संघ सतत दुसऱ्या पक्षाकडे गेल्याने काँग्रेसचे नाव या मतदारसंघातून जवळपास पुसले गेले होते

दुसरा पर्यायच ठेवला नाही; पक्षहितासाठीच अपक्ष लढलो, निलंबन त्वरित मागे घ्यावे, बागुल यांची मागणी
पुणे : पक्षाने दुसरा काही पर्यायच ठेवला नाही. कार्यक्षेत्रात पक्षाचे नाव शिल्लक राहावे, कार्यकर्त्यांना शक्ती मिळावी, यासाठीच अपक्ष लढलो. त्यामुळे आता पक्षाने निलंबन केले असेल तर ते त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र माजी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पाठवले आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असतानाही बागूल यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
तरीही बागूल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. आता त्यांनी पक्षाची अखिल भारतीय कार्यकारिणी तसेच प्रदेश कार्यालय यांना पत्र पाठवून निलंबन मागे घेण्याची तसेच बागूल काँग्रेस पक्षातच आहेत, असे पत्र देण्याची मागणी केली आहे. पर्वती मतदारसंघात आपण सलग ६ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. तरीही आघाडीच्या जागावाटपात पर्वती विधानसभा मतदारसंघ कायमच राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याने विधानसभा लढवण्याची एकही संधी मिळत नव्हती. त्यामुळे पक्षाचे नाव या कार्यक्षेत्रात शिल्लक राहावे, कार्यकर्त्यांना चेतना मिळावी, यासाठी अपक्ष लढलो, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग दोन वेळा व आता तर तिसऱ्यांदाही पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागून घ्यावा, अशी मागणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्याही कितीतरी दिवस आधी करत होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याची मागणी होत होती व ती न्याय होती. सतत मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे गेल्याने काँग्रेसचे नाव या मतदारसंघातून जवळपास पुसले गेले होते. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. अपक्ष लढल्यामुळे पक्षाचे नाव आहे व कार्यकर्तेही कायम राहिले, त्यामुळे पक्षाने आता निलंबन केले असेलच तर ते त्वरित मागे घ्यावे व बागूल पक्षातच असल्याचे जाहीर करावे, असे पत्रात बागूल यांनी नमूद केले आहे.