मंडळांमध्ये एवढी कटुता असता कामा नये; विसर्जन मिरवणुकीबाबत २५ तारखेपर्यंत समन्वयाने मार्ग काढला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:21 IST2025-08-20T11:19:59+5:302025-08-20T11:21:52+5:30
एका मंडळापुढे १ ते २ पथके असली पाहिजेत, पण काही मंडळांना विशेष वागणूक दिली जाते, सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे

मंडळांमध्ये एवढी कटुता असता कामा नये; विसर्जन मिरवणुकीबाबत २५ तारखेपर्यंत समन्वयाने मार्ग काढला जाणार
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पण एवढी कटुता असता कामा नये. गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल. गणेश मंडळाच्या विविध कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन विसर्जन मिरवणुकीबाबत २५ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेपोलिस आणि पुणे महापालिका यांच्यावतीने बालगंधर्व रंगमदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओकप्रकाश दिवटे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसाेडे, मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेचे अधिकारी, अग्निशमन दल, महावितरण, तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत विविध प्रमुख मंडळांचे ५०० पदाधिकारी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, ‘‘विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. पुण्यातील गणेशाेत्सवाला महत्त्व आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा ते विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्ताची आणखी करण्यात आली आहे. महापालिका, पोलिस, तसेच विविध यंत्रणा एकत्र येऊन काम करत आहेत. उत्सव शांततेत पार पाडणे हे उद्दिष्ट आहे. विसर्जन मिरवणुकीबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच पोलिस सर्व मंडळांचा समन्वय साधून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतील. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या बळावर उत्सव शांततेत पार पडेल. उत्सवावर निर्बंध नको, अशी पोलिसांची भूमिका आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेश आणि नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत. गैरप्रकार रोखणे, तसेच संभाव्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांनी हे कॅमेरे (फिड) पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडावेत. मंडपाच्या परिसरातील गर्दी, वाहतूक नियोजन करण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांना उपयुक्त ठरतील. उत्सवाच्या कालावधीत होणारी गर्दी, तसेच चेंगराचेंगरी, वाहतूककाेंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्यांच्या मदतीने आतापासून पाहणी करावी. गर्दी आणि कोंडीचे भाग निश्चित करून उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना अमितेश कुमार यांनी दिल्या. ‘गणेशोत्सव राज्यउत्सव जाहीर केला आहे. उत्सवासाठी पोलिस, प्रशासन एकत्र येऊन काम करत आहे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रास्ताविक केले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी आभार मानले.
प्रशासनावर अविश्वास नको
गणेशोत्सवातील दहा दिवस मंगलमय असतात. उत्सवातील दिवस भारावलेले असतात. उत्सवात शिस्त हवी. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सूचना जरूर कराव्यात. मात्र, प्रशासनावर अविश्वास ठेवू नये. उत्सवापूर्वी महापालिकेकडून सर्व कामे करण्यात येत आहेत. रस्तेदुरुस्तीबाबत काही सूचना असल्यास ‘पीएमसी रोडमित्र’ ॲपवर द्याव्यात’. क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाणार आहे. मोबाईल टाॅयलेटची संख्या वाढविली आहे. पालिका सुविधा देण्यामध्ये कमी पडणार नाही, असे महाालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.
सर्वांना समान वागणूक द्यावी
गणेशोत्सवाच्या काळात पूर्व भागातील मंडळांवर पोलिस प्रशासन एकप्रकारे अन्याय करत आहे. एका मंडळापुढे एक ते दोन पथके असली पाहिजेत. पण काही मंडळांना विशेष वागणूक दिली जाते. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. मानाच्या गणपतींची मिरवणूक लांबली जात आहे. विर्सजन मिरवणुकीत त्यांच्यापुढे अनेक पथके असतात याकडे काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.