'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:50 IST2024-10-24T15:47:22+5:302024-10-24T15:50:21+5:30
पक्षाचा काही त्रास नाही, पदाधिकऱ्यांचा काही त्रास नाही, कोणालाही दोष देऊन देऊन मी बाहेर पडत नाहीये

'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम
पुणे: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याने पक्षाला रामराम केला आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील मनसेचे पदाधिकारी रणजित शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडली. कुठलंही कारण नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.
शिरोळे म्हणाले, मी रणजित शिरोळे पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षाबरोबर काम करतोय. पक्षाने माझ्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. पक्षानं अंतर्गत जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्याही व्यवस्थित पार पाडल्या. मी शिवाजीनगर विभागात सातत्याने काम करत रहिलो. या घडामोडीत मी निवडणूक कशी लढवावी हे विचार करत होतो. पण आता मी मनसे सरचिटणीस आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. आपणही काळाबरोबर बदललं पाहिजे. म्हणून राजीनामा देत आहे. पक्षाला कंटाळून मी बाहेर पडत नाहीये. राज ठाकरे त्यांच्यासाठी माझा आदर कायम राहणार आहे. पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांकडून मला त्रास नाही. कोणालाही दोष देऊन मला बाहेर पडायचं नाहीये.
उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही बाहेर पडत आहे असा काही नाही. शिवाजीनगरला उमेदवारी जाहीर झालीच नाही. उमेदवारी बाबत काय घडलं हे काय सांगू शकत नाही. जर शिवाजीनगरला उमेदवारी जाहीर झाली असती. आणि मला मिळाली नसती तर मला का नाही दिली? असा प्रश्न मी विचारला असता. तसही काही नाहीये. मी इच्छुक होतो. पण आता मी या अशा भूमिकेत आहे कि निवडणूक लढणार आहे का नाही? बैठकांमध्ये उमेदवारीबाबत
कुठं विषय झाला नाही. आठही विधानसभा मतदार संघांवर चर्चा झाली. पण त्यामध्ये उमेदवारीबाबत काही चर्चा नाही झाली. पक्षसंघटन, पक्षाची ताकद याबाबत चर्चा झाली. हा रागातून घेतलेला निर्णय नाही. पक्षाचं काम थांबून पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.