घरातील २२ मतदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक, मदत करणार असेल तरच बेल वाजवा', पुणेरी पाटीची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:58 IST2025-12-24T14:54:02+5:302025-12-24T14:58:05+5:30
‘या घरात २२ मतदार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तर कोणी इच्छूक उमेदवार मदत करणार असेल तरच त्यांनी बेल अथवा दरवाजा वाजवावा’ हुकमावरून : घर मालक

घरातील २२ मतदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक, मदत करणार असेल तरच बेल वाजवा', पुणेरी पाटीची सर्वत्र चर्चा
पुणे : काही दिवसात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात होणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षांच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांच्या रांगा वाढताना दिसत आहेत. पक्षाकडूनही महापालिका जिंकण्यासाठी योग्य रणनीती आखली जात आहे. तब्बल ८ वर्षांनी महापालिका निवडणूक होत असल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे महापालिकेत उमेदवार आणि पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. विद्येचे माहेरघर म्हणणाऱ्या पुण्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच पुणे तिथे काय उणे हे वेगळंपण जपत एका पुणेरी पाटीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
एका घर मालकांनी शक्कल लढवत घराच्या पाट्यावर मतदाराने लावलेली पुणेरी पाटी समोर आली आहे. कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३० मध्ये एका घरावर ही पाटी लावण्यात आली आहे. या पाटीवर ''या घरात २२ मतदार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तर कोणी इच्छूक उमेदवार मदत करणार असेल तरच त्यांनी बेल अथवा दरवाजा वाजवावा’ हुकमावरून : घर मालक'' असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. ही पुणेरी पाटी समाजमाध्यमांवर खूप व्हायरल झाली आहे. पाटीची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. जगभरात पुणेरी पाटयांची चर्चा वेगळीच असते. त्यात मनपा निवडणूक जाहिर झाल्याने सर्वत्र राजकीय वातावरण चांगले तापले आहे. त्यातच शहरात व उपनगरात इच्छूक भावी नगरसेवक मतदारांना खुश करण्यासाठी सहल, यात्रा, देव दर्शन, होममिनिष्टर, बाळगोपाळ असे विविध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.