दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 14:50 IST2023-01-30T14:50:51+5:302023-01-30T14:50:59+5:30
शेतात वारंवार मृतदेह आढळून येत असल्याने यवत पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे

दौंड तालुक्यातील राहू येथे ऊसाच्या शेतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह
पाटेठाण : राहू (ता.दौड) नजीकच्या शिंदेनगर येथे एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सोमवारी (दि.३०) रोजी आढळुन आला आहे. शिंदेनगर येथील शेतकरी पुरुषोत्तम पुराणे यांच्या उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
महिला अंदाजे चाळीस वर्षे वयाची असुन अंगावर नारंगी रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या आणि बाजूला गुलाबी रंगातील चपलेचा जोड मिळाला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. राहू गावचे पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांनी घटनेची माहिती यवत पोलिसांना दिली. राहू येथे मागील पाच महिन्यापूर्वी देखील एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये बेवारस मृतदेह आढळून आला होता. तो तपास देखील अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा स्वरुपाच्या वारंवार घटना घडून येत असल्याने यवत पोलिसांसाठी नवे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत.