Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:28 IST2024-11-24T17:23:26+5:302024-11-24T17:28:31+5:30
Shivajinagar Assembly Election 2024 Result २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला

Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट
पुणे : निवडणुकीच्या आधी तब्बल वर्षभरापूर्वीची गोष्ट. पक्षांच्या वतीने सर्वेक्षण वगैरे होत असतात. भाजपनेही तसे सर्वेक्षण केले. त्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये दाखवला होता. नंतरही दोन-तीन सर्वेक्षणे झाली. त्यातही हा मतदारसंघ डेंजर झोनमध्येच होता. त्यामुळे भाजपचे आताचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी गेली, अशी चर्चाही सुरू झाली.
पण मितभाषी असलेल्या शिरोळे यांनी संयमाने त्या सर्वेक्षणाला तोंड दिले. न बाेलता मतदारसंघामध्ये फिरणे सुरू केले. थेट लोकांमध्ये जाऊन तिथे बसून त्यांच्या समस्या ऐकायच्या, त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे. ती मागणी नवोदिताने किंवा एखाद्या नगरसेवकाने केलेली गोष्ट ते सातत्याने करत गेले. त्याचाच फायदा शिरोळे यांना या निवडणुकीत झाला. थोडी मदत काँग्रेसचीही झाली. तिथे काँग्रेसच्या मनिष आनंद यांनी बंडखोरी केली.
आजारपणामुळे आल्या प्रचाराला मर्यादा
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले दत्ता बहिरट आजारी पडले. त्यामुळे त्यांच्या प्रचारावर मर्यादा आल्या. त्यामुळे शिरोळे यांना मोकळे रान मिळाले; पण त्यांना झालेले मतदान इतके जास्त आहे की बंडखोरी झाली नसती तरी ते निवडून आलेच असते. याही मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक जवळपास सोडून दिल्यातच जमा होती. अखेरच्या दोन दिवसांत सभा, फेऱ्या, रॅली अशी धूम उडवली.
राज्यस्तरीय नेते प्रचारात हाेते कुठे?
स्वत: उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झाल्यावर साडेचार वर्षे मतदारसंघातच नव्हे तर पक्षातही सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांना मतदारसंघात धूम उडवता आलीच नाही. त्या तुलनेत शिरोळे मतदारांना भेटत होते, बोलत होते. पक्षानेही त्यांना प्रचार सभा दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. राज्यस्तरीय नेत्यांनी त्यांच्या निवडणुकीकडे लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळे सलग दुसऱ्यांदा निवडून आले.
यावेळी आणखी लीड वाढला
शिवाजीनगर मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये फारसे चढ-उतार झालेच नाहीत. जसे प्रचारात झाले, तसेच मतमोजणीतही झाले. सुरुवातीपासूनच महायुतीचे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर होते. काँग्रेसचे बंडखोर असलेले मनीष आनंद यांच्यामुळे काही फरक पडणे अपेक्षित होते. मात्र, तसेही काही झाले नाही. प्रत्येक फेरीत शिरोळे यांचे मताधिक्य वाढतच गेले. मनीष आनंद यांना एकूण फक्त १३ हजार २८ मते मिळाली, काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना ४७ हजार ९९३ मते मिळाली, तर शिरोळे यांना ८४ हजार ६९५ मते पडली. तब्बल ३६ हजार ५७४ च्या लीडने शिरोळे निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र दत्ता बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला.