अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 02:17 PM2024-03-31T14:17:39+5:302024-03-31T14:20:47+5:30

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक काळात दिलीप मोहितेंची पडद्याआडून मदत मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

shirur mp Amol Kolhe took the blessings of the MLA dilip mohite patils wife | अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

Amol Kolhe ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार, हे आता निश्चित झालं आहे. आढळराव पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची ताकद उभी राहणार असल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासमोरील आव्हानात भर पडली आहे. मात्र असं असलं तरी आढळरावांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कोल्हे यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. याचीच झलक काल झालेल्या पिंपरी चिंचवडमधील एका लग्नसोहळ्यात दिसून आली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या अमोल कोल्हे यांनी मोहिते पाटलांचे आशीर्वाद मागत अप्रत्यक्षपणे तुतारी या आपल्या पक्षचिन्हाचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.

दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीचा लग्नसोहळा भोसे इथं पार पडला. या लग्नसोहळ्याला खासदार अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित होते. वधू-वरांना शुभेच्छा देताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, "पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मला येण्यास विलंब झाला. घड्याळ सुटल्यामुळे वेळ चुकली, मात्र वधू-वरांच्या आयुष्यात सुखा-समाधानाची तुतारी वाजू दे," असं म्हणत कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार केला. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी हे वाक्य उच्चारताच दिलीप मोहिते हे खळखळून हसले. त्यामुळे अजित पवार समर्थक आमदार मोहितेंचं हे हास्य आढळराव पाटलांची मात्र धाकधूक वाढवू शकते.

या लग्नसोहळ्यात अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीच्या पाया पडत आशीर्वादही घेतले. तसंच तुमचे आशीर्वाद मिळाले म्हणजे लोकसभेसाठी अण्णांचे आशीर्वाद मिळाले, अशी मिश्किल टिपण्णीही केली.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक काळात दिलीप मोहितेंची पडद्याआडून मदत मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

आढळरावांना राष्ट्रवादीची ताकद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमधील राजकीय गणिते बदलली आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबत मोठी चर्चा झाली. महायुतीत झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे निश्चित झालं. त्यामुळे नुकताच आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा चुरशीचा सामना होईल. राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आढळराव पाटील यांच्या पाठीशी यंदा पक्षाचे स्थानिक नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेत्यांचे बळ असणार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: shirur mp Amol Kolhe took the blessings of the MLA dilip mohite patils wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.