पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 18:45 IST2024-04-11T18:43:58+5:302024-04-11T18:45:36+5:30
सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं सुचवत शरद पवारांनी दिलेल्या हटके उत्तराने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.

पवार आडनावाच्या मागे उभे राहा; अजितदादांच्या गुगलीवर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराने पिकला हशा
Pune Sharad Pawar PC ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे इथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. "अजित पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार," असं म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं शरद पवारांनी सुचवल्याने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.
बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही," असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी आज सुप्रिया सुळे याच मूळ पवार असून सुनेत्रा पवार तर बाहेरून आल्या असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.
भावंडांवर केलेल्या आरोपांनाही उत्तर
अजित पवार यांनी मेळाव्यातील आपल्या भाषणातून बंधू श्रीनिवास पवार आणि सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या पवार कुटुंबातील इतर भावंडांवर निशाणा साधला होता. "माझ्या निवडणुकीला कधी माझी भावंड फिरली नाहीत. आता गरागरा पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत. तुमचा भाऊ होता त्यावेळी तुम्हाला फिरावेसे वाटलं नाही. पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला होता. यावर पलटवार करत शरद पवारांनी म्हटलं की, "आधीच्या निवडणुकांमध्ये भावंडांनी प्रचार केला नाही, हे साफ खोटं आहे. निवडणूक माझी असो, अजितची असो किंवा सुप्रियाची असो...पवार कुटुंबातील व्यक्ती नेहमीच प्रचार करत आल्या आहेत," असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या विविध आरोपांना आज शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं असून पवार कुटुंबातील हा राजकीय सामना आगामी काळात आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.