कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:31 IST2026-01-05T13:31:43+5:302026-01-05T13:31:55+5:30
निवडणूक जिंकण्यापूर्वी शब्दांच्या भरमसाठ संग्रहाने मतदारांचे मन कसे जिंकायचे याचेच आडाखे सध्या गजबजलेल्या निवडणूक कार्यालयात बांधले जात आहेत

कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत
पुणे : ‘आपकी बहन आपकी परछाई, फिर से एक बार ताई, ‘कहो दिलसे ... फिरसे ’, ‘वाटीत चिवडा.. मला निवडा’ ‘आहे अपक्ष-ठेवा लक्ष’, अभी नही तो कभी नही’, या प्रकारे विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा आता जोरदार धडाका सुरू केला आहे. ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षा गल्लोगल्ली फिरू लागल्या असून, उखाणेवजा प्रचाराने लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी आजी-माजी आणि नव्या चेहऱ्यांच्या मांदियाळीत प्रचाराची राळ उडू लागली आहे. चकचकीत डिजिटल प्रचाराने मोक्याची ठिकाणे हेरली आहेत; पण वीतभर आकारातील प्रचारपत्रकांची खिरापतही घरोघरी पोहोचवली जात आहे. भव्य फलक असो वा हातभर पत्रक त्यात मतांसाठी शब्दांचा खेळ करणारे नमस्कारासाठी हात जोडून फिरत आहेत. उमेदवाराचा परिचय करून देण्यापासून ते रिंगणात उतरण्याची भूमिका सांगण्यापर्यंत सर्व महत्त्वाची कामगिरी बजावणारे निवेदन पत्रकांवर शब्दांचे मनोरे रचण्याची नामी युक्ती छाप पाडत आहे. नमस्कार मी...., किंवा नम्र निवेदन....अशा अदबीच्या शब्दांच्या गोतावळ्याची प्रचारपत्रकावर जत्राच भरली आहे. बंधू-भगिनींनो म्हणत नाते जोडणाऱ्या शब्दांची मोहोरही त्यावर उमटली आहे. विद्यमानांनी आपल्या निवेदनात पाच वर्षांतील विकासकामांची माळ शब्दांच्या गाठी मारून ओवली आहे, तर विद्यमान नगरसेवकांकडून दुर्लक्षित झालेल्या भागातील समस्यांचा पाढा वाचण्यासाठी माजी नगरसेवकांकडून टीकात्मक शब्दांचा आधार घेतला जात आहे. नव्यानेच रिंगणात पाऊल टाकलेले उमेदवार ‘नवा विचार, नवी व्यक्ती... विकासाची बना शक्ती’ असा शब्दांचाच फुलोरा फुलवत मताचं दान मागत आहेत. अपक्षांनीही ‘आहे अपक्ष, ठेवा लक्ष’ अशी आर्त हाक दिली आहे. निवडणूक जिंकण्यापूर्वी शब्दांनी मतदारांचे मन कसे जिंकायचे याचेच आडाखे सध्या गजबजलेल्या निवडणूक कार्यालयात बांधले जात आहेत. त्यासाठी शब्दांचा भरमसाट संग्रह असणाऱ्या माणसांची यासाठी खास नेमणूकच केली आहे.