दौंडजवळ कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा; चोरटयांनी रेल्वे थांबवण्यासाठी सिग्नलच्या वायरी तोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 10:21 IST2021-10-27T10:21:39+5:302021-10-27T10:21:57+5:30
रेल्वे सिग्नलच्या वायरी कट केल्याने सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या कोणार्क एक्सप्रेसवर तिघा चोरट्यांनी टाकला

दौंडजवळ कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा; चोरटयांनी रेल्वे थांबवण्यासाठी सिग्नलच्या वायरी तोडल्या
पुणे : रेल्वे सिग्नलच्या वायरी कट केल्याने सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या कोणार्क एक्सप्रेसवर तिघा चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करुन खिडकीतून दोघा महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. बहिणीची सोनसाखळी चोरणार्या या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली उतरलेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचार्याचा मुलगा चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ रात्री पावणे नऊ वाजता घडली. दौंड रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विनायक श्रीराम (वय २७, रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क एक्सप्रेस रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरुन सुटली. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती दौंड रेल्वे स्टेशनच्या आऊटला असलेल्या नानविज फाटा येथे आली. तिला सिग्नल न मिळाल्याने ती थांबली होती. चोरट्यांनी सिग्नलच्या वायरी कट केल्याने तिला सिग्नल मिळाला नव्हता. गाडी थांबल्याचे पाहिल्यावर अंधारातून तिघे चोरटे पुढे आले. त्यांनी एस ४ या डब्यात खिडकीत बसलेल्या महिलेल्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावले. तिने आरडाओरडा करताच चोरटे पुढे पळाले. त्यांनी एस - १ डब्यातील दरवाज्यात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. बहिणीची चैन हिसकाविल्याचे पाहिल्यावर विनायक श्रीराम हे खाली उतरले. त्यांनी चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तेव्हा चोरट्यांनी रेल्वमार्गावरील दगड उचलून त्यांना मारले. त्यात त्यांच्या पायाला दगड लागून ते जखमी झाले. चोरटे अंधारात पळून गेले.
विनायक श्रीराम हे निवृत्त रेल्वे कर्मचार्यांचे चिरंजीव आहेत. ते बहिणीसह सोलापूरला जात होते. त्यांच्यावर दौंड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलबुर्गी तपास करीत आहेत.