मानाच्या गणेश मंडळांनी पाळली वेळ, पावित्र्य अन् शिस्तही! तरीही विसर्जन मिरवणुकीला विलंब, पाेलिसांकडे बाेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:53 IST2025-09-08T18:52:52+5:302025-09-08T18:53:32+5:30
पुण्यातल्या मंडळांनी मात्र विक्रमी ३४ तास ४४ मिनिटे मिरवणूक चालवून २००५ सालचा ३३ तासांचा विक्रम माेडीत काढला. याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे

मानाच्या गणेश मंडळांनी पाळली वेळ, पावित्र्य अन् शिस्तही! तरीही विसर्जन मिरवणुकीला विलंब, पाेलिसांकडे बाेट
पुणे: जगभरातील भाविकांनी पुण्यातील गणेशाेत्सवात सहभाग घेत आनंद मिळवला. विसर्जन मिरवणुकीतदेखील ते उत्साहाने सहभागी झाले हाेते. विशेष म्हणजे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने नवा विक्रम रचला आहे. एकीकडे मानाच्या गणपती मंडळांनी वेळ, पावित्र्य अन् शिस्तीचे पालन करत आदर्श घालून दिला आहे, याबद्दल पुणेकरांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे काैतुक केले. इतर मंडळांनी मात्र विक्रमी ३४ तास ४४ मिनिटे मिरवणूक चालवून २००५ सालचा ३३ तासांचा विक्रम माेडीत काढला. याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने गणेशाेत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा जाहीर केला. त्याचे सर्वांनी काैतुकही केले. साेबतच निर्बंध शिथिल करून चुकीचा विक्रम करण्यास प्राेत्साहन दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे. उत्सव आनंददायी, शांततेत, निर्विघ्न आणि वेळेत पार पडावा म्हणून पाेलिसांनी उत्सव सुरू हाेण्यापूर्वी आणि उत्सव काळातही सातत्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबराेबर बैठका घेतल्या. सूक्ष्म नियाेजन करत मिरवणुकीचा वेळ कमी करण्यावर भर दिल्याचे सांगितले. प्रत्यक्ष घडले उलटेच. मानाच्या गणपती मंडळांनी पाेलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विसर्जन मिरवणूक वेळेआधी संपवून आदर्श निर्माण केला. अन्य बहुतांश मंडळांनी मात्र ना वेळेची मर्यादा पाळली, ना आवाजाची. तरीही पाेलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मागील वर्षांपेक्षा चार तास उशिरापर्यंत मिरवणूक चालल्यानंतर पाेलिस आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण आश्चर्यकारक हाेते. मिरवणूक एका ठराविक वेळेतच पार पाडली जावी यासाठी मी आग्रही नव्हतो, असे आयुक्त म्हणाले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस दल कटिबद्ध होते, असे म्हणत वेळेच्या नियाेजनाबाबत हात झटकले. याबद्दल मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्सवातील धार्मिकता, एकात्मता, पावित्र्य आणि आनंद टिकून राहावा, असा आमचा प्रयत्न आहे. तीच भाविकांचीदेखील धारणा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उत्सवातील धांगडधिंगा कमी करण्याबाबत पाेलिसांसह सरकारनेही गांभीर्य बाळगणे आवश्यक आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींनी त्यांना मिळणारा मान हा फक्त मिरवणुकीचा क्रम ठरविण्याचा नव्हे, तर जबाबदारीचा भाग आहे, हे कृतीतून सिद्ध केले आहे. सूक्ष्म नियोजन करत ‘जल्लोषासोबत जबाबदारी’ हा संदेश दिला आहे. मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाने त्यांची विसर्जन मिरवणूक प्रशासनाने दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी टिळक चाैकात आणत आदर्श घालून दिला. साेबतच अन्य चार मानाच्या मंडळांनीदेखील अगदी जबाबदारीने, दिलेला शब्द पाळत, जल्लोष, उत्साह व परंपरेला कोणताही छेद न देता वेळेत विसर्जन मिरवणूक पूर्ण केली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासोबतच ती परिपूर्ण कशी करता येईल, यावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे. मानाच्या मंडळांमुळे विसर्जन मिरवणूक लांबते हे विधान आम्ही कृतीतून फोल ठरवले आहे. यापुढेदेखील पुण्याचा गणेशाेत्सव अधिक समृद्ध व आनंदी होण्याच्या दृष्टीने दिशा देत राहू, असा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.