Pune Visarjan 2025: पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० ला सुरु होणार; प्रत्येक मंडळापुढे २ ढोल-ताशा पथके
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:52 IST2025-09-04T11:50:58+5:302025-09-04T11:52:33+5:30
टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर कोणतेही मंडळ आपली मिरवणूक सकाळी साडेदहाच्या पूर्वी सुरू करणार नाही

Pune Visarjan 2025: पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० ला सुरु होणार; प्रत्येक मंडळापुढे २ ढोल-ताशा पथके
पुणे : दोन गणेश मंडळांतील अंतर, मानाच्या गणरायांबरोबर असणारा मोठा लवाजमा, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला खूप वेळ लागायचा. तासन् तास रेंगाळणाऱ्या विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षी यामुळे टीकादेखील होत असे. ही टीका टाळण्यासाठी पुणे शहर पोलिस दलाकडून यंदा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मानाच्या गणेश मंडळांसह महत्त्वाच्या गणेश मंडळांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी वारंवार चर्चा करूनच हे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
त्यानुसार अनंत चतुर्दशीला सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदैवत कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार असून, सव्वा पाच तासांत ते टिळक चौकात (अलका टॉकिज चौक) पोहोचतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे. मानाच्या सर्व गणपतींना सव्वा पाच ते सहा तास इतका वेळ देण्यात आला आहे. प्रत्येक मंडळाचा गणपती कोणत्या चौकात किती वाजता आला पाहिजे, याचे नियोजन पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानुसार दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकात येणार आहे. प्रत्येक मंडळापुढे जास्तीतजास्त २ ढोल-ताशा पथके असतील. प्रत्येक पथकामध्ये वादक व त्यांच्या मदतीस सहायक मिळून एकूण ६० सदस्य राहतील. यासह कोणतेही ढोल-ताशा पथक हे स्थिर वादन करणार नाही, असेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीत सर्वांना सर्वाधिक प्रतीक्षा असते ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची. त्यापूर्वी जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ ही गणपती मंडळे असतात. यंदा यांच्या अगोदर दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून दुपारी ४ वाजता पुढे जाणार आहे. त्यानंतर लक्ष्मी रोड, शिवाजी रोडवरील गणपती मिरवणुकीत सामील होतील. सायंकाळी साडेपाच ते सायंकळी ७ वाजेपर्यंत जिलब्या मारुती, हुतात्मा बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजल्यानंतर विद्युत रोषणाई असलेली मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींसाठी निश्चित केलेला वेळ..
गणपती मंडळ - लोकमान्य टिळक पुतळा, मंडई ते टिळक चौक (अलका टॉकिज चौक) - एकूण वेळ
कसबा गणपती - ०९:३० ते २:४५ - ५ तास १५ मिनिटे
तांबडी जोगेश्वरी - ०९:४५ ते ०३:०० - ५ तास १५ मिनिटे
गुरुजी तालीम - १०:०० ते ०३:३० - ५ तास ३० मिनिटे
तुळशीबाग - १०:१५ ते ०४:०० - ५ तास ४५ मिनिटे
केसरीवाडा - १०:०० ते ०४:०० - ०६:०० तास
दगडूशेठ हलवाई - (बेलबाग चौक) १६:०० ते १९:३० - ३ तास ३० मिनिटे
विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने
१) मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडला मार्गस्थ होईल. त्यानंतर ६व्या क्रमांकावर महापालिका गणपती मंडळ व ७व्या क्रमांकावर त्वेष्ठा कासार गणपती हे दुपारी १ वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ होतील.
२) त्यानंतर शिवाजी रोड, लक्ष्मी रोडवरील मंडळे बेलबाग चौकातून पावणे चार वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
३) दुपारी चार वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे बेलबाग चौकात आगमन होईल.
४) त्यानंतर रांगेतील मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
५) साडेपाच वाजेनंतर जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
६) सायंकाळी ७ वाजेनंतर विद्युत रोषणाईची मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.
७) मानाचे गणपती मिरवणुकीमध्ये टिळक पुतळा मंडई ते बेलबाग चौक दरम्यान कोणतेही ढोल-ताशा पथक वाद्य वाजविणार नाही. बेलबाग चौकापासून ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सामील होऊन वाद्य वाजवतील.
८) गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये मंडळासोबत डीजे अथवा ढोल-ताशा पथक यापैकी एकालाच परवानगी राहील.
९) कोणत्याही मंडळाचे ढोल-ताशा पथक हे स्थिर वादन करणार नाही.
१०) टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर कोणतेही मंडळ आपली मिरवणूक सकाळी साडेदहाच्या पूर्वी सुरू करणार नाही.
यंदा एक तास अगोदर मिरवणुकीला सुरुवात..
पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा शनिवारी (दि. ६) एक तास अगोदर सुरू होणार असून, मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे पावले उचलली आहेत. त्याला मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांनी सहकार्य करण्याची सहमती दर्शवली आहे. मागील वर्षी सकाळी साडेदहा वाजता सुरू विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. यंदा सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सर्व गणेश मंडळांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन नियोजन केले आहे. मानाच्या मंडळांसह अन्य मंडळांनी वेळ पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने वेळेत पार बसेल असेही त्यांनी सांगितले.