PMC Election 2026: कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:57 IST2025-12-30T11:56:47+5:302025-12-30T11:57:09+5:30
Pune Mahanagarpalika Election 2026: गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयश्री मारणे यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे

PMC Election 2026: कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी
पुणे : पुणे महानगरपालिकेत मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीची युती काल जाहीर झाली आहे. तर थोड्या वेळापूर्वीच शिवसेना भाजप युती तुटल्याचे समोर आले आहे. अशातच कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहेत. गुंडाची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. आता जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार जाहीर झाल्या आहेत. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.
अजित पवारांनी एका कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गॅंग बंद झाली पाहिजे. अशी सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. तुम्ही आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्यावर भर द्या असंही ते म्हणाले होते. पुण्यातील गुन्हेगारी मिटवा म्हणणारे अजित पवार एका गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर खंडणी, दहशत, खून यासारखे अनेक गुन्हे आहेत. गजा मारणेच्या घरी मध्यंतरी काही नेत्यांनी भेटही दिली होती. आता पुन्हा त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने गुंडांना राजकीय पाठबळ दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.