PMC Elections : प्रभाग क्रमांक २३ मध्ये आंदेकर विरूघ्द कोमकर लढत होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:03 IST2025-12-31T18:02:27+5:302025-12-31T18:03:33+5:30
- कल्याणी कोमकर यांनी याच प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला

PMC Elections : प्रभाग क्रमांक २३ मध्ये आंदेकर विरूघ्द कोमकर लढत होणार
पुणे:पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधुन राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन (अजित पवार ) लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर कल्याणी कोमकर यांनी याच प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आंदेकर आणि कोमकर यांच्यात लढत होणार आहे. या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि त्यांचा भाचा आयुष कोमकर या दोघांच्या खुनानंतर आंदेकर आणि कोमकर कुंटुबांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन (अजित पवार ) पक्षाने आंदेकर कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी देउ नये अशी मागणी कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषद घेउन केली होती. मात्र, राष्टवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाकडन दोघींना उमेदवारी देण्यात आली.
लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कल्याणी काेमकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आंदेकर आणि कोमकर यांच्या लढत होणार आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरूंगातुन निवडणुक लढविणार आहेत.
तत्पूर्वी, आयुष कोमकरच्या आई संजीवनी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना आंदेकर कुटुंबियांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती केली होती.'जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. सत्ता होती म्हणून त्यांनी आजवर सर्व काही केलं. कृपया त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका' असे त्या म्हणाल्या होत्या तसेच, जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदाला न्याय हवा आहे. एवढेच मला पाहिजे.. अशी भावनिक प्रतिक्रिया संजीवनी कोमकर यांनी व्यक्त केली होती.