PMC Elections 2026: 'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:26 IST2026-01-10T10:25:01+5:302026-01-10T10:26:02+5:30
देवा भाऊ नसून मेवा भाऊ आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

PMC Elections 2026: 'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
पुणे : महापालिका निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढवण्याऐवजी भारतीय जनता पक्ष खान की बाण, उर्दू की मराठी, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र अशा विभाजनवादी प्रश्नांवर निवडणूक लढवीत आहे. भाजपने गेल्या सत्ताकाळात कोणतीही कामे केली नसल्याने त्यांना या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागत आहे. पैसा फेको आणि तमाशा देखो अशी स्थिती भाजपची झाली असून, कमिशनखोरी, कोयता गँगच्या माध्यमातून गुंडांना पाठबळ, जमिनी लाटणे असे प्रकार सुरू आहेत. देवा भाऊ लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन केसाने गळा कापत आहे. त्यामुळे तो देवा भाऊ नसून मेवा भाऊ आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार आता त्यांच्यावर टीका करीत आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊन स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यावेळी उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, पुण्यात पाणीपुरवठा, साफसफाई, कचरा, पथदिवे, वाहतूक हे मुद्दे महत्त्वाचे असताना निवडणूक भलत्याच मुद्द्यांवर लढवली जात आहे. अजित पवार एकीकडे सत्तेत असताना भाजपवर टीका करीत आहेत. त्यामुळे ही नुरा कुस्ती असून, अजित पवार यांनी आता राजीनामा देऊन भाजपविरोधात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. माल खाताना एकत्र; तर शिव्या देताना मात्र, वेगळी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांना स्वाभिमान असल्यास तातडीने सत्तेबाहेर यावे.
रेशनमधून मिळणारे गोरगरिबांचे धान्य देवाभावने हिरावून घेतले आहे. आज उद्या तुमच्या घरावरही बुलडोझर फिरवून या ठिकाणी इमारती उभ्या केल्या जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पुणे शहर हे विचारांचे शहर आहे. ते त्यातून उणे होता कामा नये. इतिहास, नावे पुसून टाकणे हा भाजपचा विचार आहे. त्यांच्याच पक्षातील गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे नाव पुसून टाकण्याचे काम करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फोडून त्यांचेही नाव पुसले जात आहे. भाजपने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव पुसण्याचे काम चालवले आहे. भाजपच्या या अहंकाराला धडा शिकविला पाहिजे, असे ते म्हणाले.