PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:39 IST2026-01-08T20:37:05+5:302026-01-08T20:39:26+5:30
PMC Election 2026 राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष राज्याचे लचके तोडत असून या पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत.

PMC Election 2026: पुणे मेट्रोचे भूमिपूजन करून त्याचा पाया आम्हीच रचला; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
पुणे : भाजप आणि राष्ट्रवादीत मेट्रोवरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यात उडी घेत मेट्रोचे भूमिपूजन आपणच केले असून, त्याचा पाया आम्हीच रचला आहे. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतरांनी करू नये. भाजपने केवळ पोकळ घोषणाच केल्या असून, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पुणे-मुंबईदरम्यानच्या हायपरलूप घोषणेचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला, तसेच स्मार्ट सिटीच्या निधीबाबत अहवाल द्या, अशी मागणी करत विकासकामांच्या फुशारक्या मारू नका, अशी टीकाही केली. तर गुंडांना जवळ करणाऱ्या या दोन्ही पक्षांनी निवडून आल्यानंतर युती करणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री व पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांनी केली.
काँग्रेस भवनात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस व उद्धवसेनेचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजीत दरेकर, शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष राज्याचे लचके तोडत आहेत. या पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग पुणे सोडून जात असून नवीन गुंतवणूक शहरात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारकडून मोठ-मोठ्या गुंतवणूक घोषणांचा गाजावाजा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस गुंतवणूक दिसून येत नाही. नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे अत्याधुनिक उद्योग पुण्यात आले नाहीत. काँग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे अभिवचन देत आहे, असेही ते म्हणाले.
आपण मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला होता व त्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे श्रेयवाद करू नये. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत. मात्र, चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शहराची शैक्षणिक व औद्योगिक ओळख धोक्यात आली आहे. जैवविविधतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टेकड्या नष्ट होत असून, सत्तेत आल्यावर या विषयावर गांभीर्याने काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सतेज पाटील म्हणाले, “पुणे फर्स्ट” हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे. पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला लवादाकडे दाद मागावी लागत आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने काय केले? पुण्याच्या विकासात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. अजित पवार यांनी गुंडांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप म्हणजे पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक आहे. निवडणुकीनंतर आपण आघाडी करणार नाही, असे दोन्ही पक्षांनी जाहीर करावे.”