PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:32 IST2026-01-10T17:30:46+5:302026-01-10T17:32:00+5:30
- ९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं.

PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएल बस आणि मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केली. मात्र या घोषणांवर भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका करत अजित पवारांना टोला लगावला आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,“महापालिकेत सत्ता येणारच नसेल तर काहीही घोषणा करायला काय हरकत आहे? जाहीरनामे हे पूर्ण करण्यासाठी नसतात, तर फक्त हमी देण्यासाठी असतात.” अजित पवार पूर्वीही अनेक वेळा घोषणांबाबत गोंधळात टाकणारी वक्तव्ये करत आले असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं.”
चंद्रकांत पाटील यांनी इतर राज्यांतील निवडणूक घोषणांचाही दाखला दिला. “निवडणूक जिंकण्याची शक्यता नसताना अशा प्रकारच्या लोकांना भुरळ घालणाऱ्या घोषणा केल्या जातात. बिहारमध्ये काँग्रेसने महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यामागेही तेच गणित होतं,” असे ते म्हणाले.
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर बोलताना पाटील म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या हे चांगलं आहे, पण आता पक्षाचं नाव काय असणार, हेही पाहावं लागेल.” पुणे महापालिकेत सत्ता मिळणार नसताना अशा मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीका करत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरमहा सुमारे साडेसात कोटी रुपयांचे इंधन वाया जाते, तर वार्षिक १० हजार ८०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान पुणेकरांना सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून पीएमपीएमएल बस आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला असून, यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये खर्च येईल, मात्र प्रदूषणात मोठी घट होईल, असेही त्यांनी नमूद केले.