PMC Election 2026: २०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 21:09 IST2026-01-07T21:08:22+5:302026-01-07T21:09:57+5:30
PMC Election 2026 त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली

PMC Election 2026: २०१७ च्या अगोदर पुणेकरांची निराशा; त्यांना आता नवा कारभारी नको, मोहोळ यांचे अजित पवारांना उत्तर
पुणे : महापालिकेमध्ये २०१७ पूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांनी पुणेकरांची निराशा केली. त्यामुळे पुणेकरांनी शहराचा कारभारी बदलून भाजपला सत्ता दिली. आम्ही सत्ताकाळात पुणेकरांसाठी विकासकामे केल्याने या निवडणुकीत पुणेकरांना नवीन कारभारी नको आहे, असे उत्तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीतील प्रमुख पक्ष आमने सामने आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये प्रमुख लढत आहे. त्यामुळे भाजपचे विविध नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दोन्ही महापालिकांमधील सत्ताधारी भाजपने विकासकामे न करता भ्रष्टाचार केला असून, शहराच्या कारभाऱ्यांनी केवळ रिंग करून हव्या त्या ठेकेदाराला कामे देऊन पैसे कमवल्याचा आरोप करत अजित पवार कारभारी बदला, असे आवाहन वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अजित पवार यांना उत्तर दिले. त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली. मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे पुणेकर या महापालिका निवडणुकीत आम्हाला पुन्हा सत्ता देणार आहेत, त्यांना नवीन कारभारी नको आहे.