PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:29 IST2026-01-02T12:27:18+5:302026-01-02T12:29:27+5:30
PMC Election 2026 आपल्याच महायुतीत एका महत्वाच्या नेत्यावर खासदार असणाऱ्या व्यक्तीने असे बोलणे हे योग्य नाही

PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर
पुणे : गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढणार आहे, त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील, अशी खरमरीत टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. या वक्तव्याबाबत बोलताना अमोल बालवडकर यांनी आम्हीही जशास तसे उत्तर देऊ म्हणत मोहोळ यांचा समाचार घेतला आहे.
बालवडकर म्हणाले, कालपर्यंत मी भाजपाची भूमिका मांडत होतो. आता मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला. कामाचा माणूस म्हणून मी पक्षाची भूमिका मांडतो. माझ्या नेत्यावर जर अशा पद्धतीने तुम्ही बोलत असाल तर त्याला आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत. राज्यात महायुतीचे सरकार आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत. अशा वेळी आपल्याच युतीत एका महत्वाच्या नेत्यावर खासदार असणाऱ्या व्यक्तीने बोलणे हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले मोहोळ?
कोयता गँग संपली पाहिजे, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. हे त्यांच्या कोणत्या तत्त्वात बसते, कळत नाही. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारी वाढणार आहे, त्यामुळे पुणेकर मतदानातून त्यांना उत्तर देतील, अशी खरमरीत टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती.