PMC Election 2026: माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:29 IST2026-01-08T18:25:50+5:302026-01-08T18:29:58+5:30
PMC Election 2026 माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेवक विजय मारटकर यांची सून निकिता मारटकर मध्यवर्ती भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

PMC Election 2026: माजी नगरसेवकांची पत्नी अन् सून निवडणुकीच्या रिंगणात; पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३ महिलांची लक्षवेधी लढत
पुणे : पुण्यात मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रभाग २३ (रविवार पेठ- नाना पेठ) मधून लक्षवेधी लढत होणार असल्याची चिन्हे दिसून लागली आहेत. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना आणि उद्धवसेना या तिघांमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत कुठल्याही एकाच पक्षाने या प्रभागावर वर्चस्व निर्माण केले नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे नगरसेवक या प्रभागातून निवडून आले आहेत,.
आता या प्रभागातून राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक दिवंगत वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेसेनेकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धवसेनेकडून माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या सून निकिता दीपक मारटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१७ च्या निवडणुकीत वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नी सोनाली आंदेकर निवडणूक लढवत आहेत. सोनाली आंदेकर आणि कुटुंब हे आयुष कोमकर खून प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे वनराज आंदेकर यांनी मागील काळात केलेली कामे पाहून नागरिक सोनाली यांना मतदान करणार का? हे पाहणं महत्वाचं आता ठरणार आहे. तसेच गुन्हेगारी, आयुष कोमकर खून प्रकरणात अडकलेले आंदेकर कुटुंब या मतदानाला कसे सामोरे जाणार हा सुद्धा आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच गटातून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. रवींद्र धंगेकर यांना लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांची हॅट्रिक झाली आहे. त्यांनी आतापर्यंत तीन पक्ष बदलले आहेत. शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता ते शिंदेसेनेत पुण्याचे महानगरप्रमुख आहेत. मागील निवडणुकीत या प्रभागातील लोकांनी धंगेकरांना साथ दिली होती. पक्ष बदलूनही निवडून दिले. मात्र आता त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तसेच २ पराभवाचं ओझं धंगेकरांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे मतदार त्यांना साथ देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर याच गटातून तिसऱ्या महिला उमदेवार निकिता मारटकर या उद्धवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माजी नगरसेवक दिवंगत विजय मारटकर हे २००७ साली शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता बऱ्याच वर्षानंतर मारटकर हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणावर ताकद लावावी लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पक्ष कि उमेदवार
रवींद्र धंगेकर, वनराज आंदेकर आणि विजय मारटकर यांना पक्षापेक्षा उमदेवार बघूनच नागरिकांनी नगरसेवक पदाची संधी दिली होती. त्यांची कामे बघून नागरिकांनी मतदान केले होते. गेल्या ८ वर्षांत नगरसेवक पदाची निवडणूक झाली नाही. तेव्हापासून राजकीय चित्र फारच बदलले आहे. राजकीय घडामोडी, पक्षफोडी, बंडखोरी, मोठ्या प्रमाणावर पक्ष बदल यांचे प्रमाण वाढले आहे. या महिला उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. या तीन महिलांमध्ये नागरिक कोणाला नगरसेवक पदाची संधी देणार हे १६ जानेवारीलाच कळणार आहे.