PMC Election 2026: भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:58 IST2026-01-07T20:55:32+5:302026-01-07T20:58:00+5:30
PMC Election 2026 राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय १६ जानेवारीच्या निकालानंतर होईल, तोपर्यंत जरा कळ काढा

PMC Election 2026: भाजप नेत्यांचा युती तोडण्याचा इशारा? तो निर्णय १६ जानेवारीनंतरच, अजित पवारांचे स्पष्टीकरण
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘अलार्म’ ही धोरणात्मक मोहीम सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भाजपवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असून राज्यातील युती तोडणार असल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे? याबाबत विचारले असता, त्यावर मी काहीही बोलणार नाही. राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय १६ जानेवारीच्या निकालानंतर होईल. तोपर्यंत जरा कळ काढा, असेही त्यांनी सांगितले.
एक अलार्म, पाच काम
पुणे आणि पिंपरी चिचंवड दोन्ही शहरांमधील कारभारी तसेच प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आणि विविध उपायोजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेले आहे. पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांनी आपल्या शहराची स्थिती सुधारण्यासाठी हा अलार्म बंद करायचा आहे. यामध्ये पायाभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पाणी पुरवठ्याची हमी, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते, वेळेवर कचरा संकलन आणि संपूर्ण स्वच्छता, सार्वजनिक जागा आणि प्रदूषण निर्मूलन : सर्व वयोगटातील लोकांसाठी राखीव क्रीडांगणे आणि विरंगुळा पार्क आणि प्रदूषण नियंत्रण, प्रत्येक प्रभागात सुसज्ज, सुलभ आरोग्य सुविधा देण्यावर भर असणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
...म्हणून अलार्म मोहीम सुरु केली
महापालिकेच्या तोंडावर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाऱ्यांनी केलेल्या कारभाराची पोलखोल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या दोन्ही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अनागोंदी कारभार केला आहे. या दोन्ही शहरांमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांवर तो़डगा काढून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘अलार्म’ ही मोहिम सुरु केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.