PMC Election 2026: पुण्यात आतापर्यंत ६७ जणांनी घेतली माघार; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:48 IST2026-01-02T09:48:51+5:302026-01-02T09:48:59+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले असून अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला

PMC Election 2026: पुण्यात आतापर्यंत ६७ जणांनी घेतली माघार; उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी दिवसभरात ६७ उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूर चाळमधील भाजपच्या उमेदवार पूजा जाधव यांचा समावेश आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी बंडखोराचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात १७४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर गुरुवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आज दिवसभरात ६७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे
बंडखोरी शमविण्यात यश येणार का?
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले आहेत. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात प्रवेश केला. काही माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विशेष करून बंडखोरी केलेल्यांचे बंड शमविण्यात यश येणार का हे आजच स्पष्ट होणार आहे.
धीरज घाटे, धनंजय जाधव यांचे अर्ज वैध
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे धनंजय जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. या हरकतीवर सुनावणी झाली. त्यात धीरज घाटे आणि धनंजय जाधव यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे घाटे आणि जाधव यांना दिलासा मिळाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाचे नाव - अर्ज माघारी संख्या
* येरवडा-कळस-धानोरी- ५
* नगर रोड-वडगावशेरी- ९
* कोथरूड-बावधन- ३
* औंध-बाणेर - ६
* शिवाजीनगर-घोले रोड- ४
* ढोले-पाटील रोड- २
* हडपसर-मुंढवा- ०
* वानवडी-रामटेकडी- १२
* बिबवेवाडी- २
* भवानी पेठ- ३
* कसबा-विश्रामबाग वाडा-२
* वारजे-कर्वेनगर- ४
* सिंहगड रोड- ८
* धनकवडी-सहकारनगर- ५
* कोंढवा-येवलेवाडी- २
* एकूण - ६७