PMC Election 2026: पुण्यात १६५ जागांसाठी १ हजार १६५ जण रिंगणात; जाणून घ्या, तुमच्या भागातील उमेदवारांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:45 IST2026-01-03T10:45:25+5:302026-01-03T10:45:43+5:30
PMC Election 2026 ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे

PMC Election 2026: पुण्यात १६५ जागांसाठी १ हजार १६५ जण रिंगणात; जाणून घ्या, तुमच्या भागातील उमेदवारांची संख्या
पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिंदेसेना यांची युती झालीच नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे पुणे महापालिका निवडणूक चौरंगी होत असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यात प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबागमधून भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १६५ जागासाठी १ हजार १६५ उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात राहिले आहेत.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीबाबत निर्णय होऊ शकतो, असे मंत्री उदय सांमत यांनी सांगितले होते; पण आजही युतीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. भाजप आणि शिंदसेनेचे उमेदवार एकमेेकासमोर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. पुणे आणि पिपंरी चिंचवड पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्हीची आघाडी तर काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे एकत्र लढत आहे. त्यामुळे निवडणूक चौरंगी झाली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच सर्व पक्षांच्या नेत्यांची फोनाफोनी सुरू होती. विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत आश्वासनांची खैरात देऊन उमेदवारी अर्ज मागेे घेण्यास काहींना भाग पाडले. मात्र काहींनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे उमेदवारासह पक्षनेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबागमधून अ जागेवर भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि ब जागेवरून श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पालिकेने भाजपमध्ये खाते उघडलेले आहे. पालिका निवडणुकीसाठी २ हजार १३४ जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ४१ प्रभागांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९६९ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीमुळे निवडणूक चुरशीची होणार
भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) दोन्हीची आघाडी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला टक्कर देणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
प्रभाग क्र. नाव : रिंगणात राहिलेले उमेदवार - माघार घेतलेल्याची संख्या
१ कळस - धानोरी - लोहगाव उर्वरित : ३६- २८
२. फुलेनगर - नागपूर चाळ : ४३ - २७
३. विमाननगर - लोहगाव : ४३ - २५
४. खराडी-वाघोली : २१ - ३५
५. कल्याणी नगर-वडगाव शेरी : २७- २७
६. येरवडा-गांधीनगर : २१ - ११
७ गोखलेनगर-वाकडेवाडी : ३४ - ३२
८ औंध-बोपोडी : २५ - १६
९ सुस-बाणेर -पाषाण : २८- १४
१० बावधन-भुसारी कॉलनी : २२- १४
११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर : २५-८
१२ छ. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी : २९- २३
१३ पुणे स्टेशन-जय जवान नगर : १५- १२
१४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा : ३४ - २४
१५ मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसातरा नळी : ३३ - १७
१६ हडपसर-सातववाडी : ३८ - ५१
१७ रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी : २९ - २७
१८ वानवडी-साळुंके विहार : ४१ - २६
१९ कोंढवा खुर्द-कौसर बाग : २२ - १७
२० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी : ४० -३२
२१ मुकुंद नगर-सॅलसबरी पार्क : २७ - ५४
२२ काशेवाडी-डायस प्लॉट : २०- १५
२३ रविवार पेठ-नाना पेठ : ३३ - २८
२४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल- के. ई. एम हॉस्पिटल : ४०-४४
२५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई : ३८- २९
२६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी : ३३ - २४
२७ नवी पेठ-पर्वती : ३९ - ५४
२८ जनता वसाहत-हिंगणे खुर्द : २३ - ९
२९ डेक्कन जिमखाना-हॅप्पी कॉलनी : ३१-३५
३० कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी : ३२ - ११
३१ मयूर कॉलनी-कोथरूड : १६- १०
३२ वारजे-पॉप्युलर नगर : १९- १९
३३ शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट : २५ -२०
३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी : २२ - २४
३५ सनसिटी-माणिक बाग : २० - १४
३६ सहकारनगर-पद्मावती : ७ - १३
३७ धनकवडी-कात्रज डेअरी : २२- २६
३८ बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज : २७ - ९
३९ अप्पर सुपर-इंदिरानगर : ३६- २९
४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी : २२ - १६
४१ महंमदवाडी-उंड्री : २७ - २०
एकूण ११६५ - ९६९