लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:42 IST2024-04-19T16:40:25+5:302024-04-19T16:42:50+5:30
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले असून एकमेकांवर घणाघाती आरोप केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा
Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढतीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले असून एकमेकांवर घणाघाती आरोप केले जात आहेत. एकसंध कुटुंब म्हणून ज्या कुटुंबाची राज्याच्या राजकारणात ओळख होती, त्या पवार कुटुंबात राजकीय युद्ध सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त करत हे कुटुंब निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र यावं, अशी आपली इच्छा असल्याचं सांगितलं आहे.
पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाबद्दल संजय काकडे म्हणाले की, "एकमेकांचा इतका आदर करणारं कुटुंब आज अशा थराला जात आहे. त्यामुळे मी चुकीच्या क्षेत्रात आहे की काय, असं मला स्वत:ला वाटायला लागलं आहे. परंतु बघू... वेळ-काळ असते, निवडणुकीत असं बोललं जातं. मात्र निवडणुकीनंतर हे कुटुंब एकत्र यावं, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे. त्यांचे आधीचे जे स्नेहभावाचे संबंध होते, ते तशेच राहावेत," अशी इच्छा काकडे यांनी व्यक्त केली आहे.
"सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार"
एकीकडे पवार कुटुंबाचं मनोमिलन व्हावं, अशी इच्छा व्यक्त करत असतानाच आपण बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्माचं पालन करणार असल्याचंही संजय काकडे म्हणाले. "बारामतीत सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत. पुढील काही दिवसांत मी माझी सर्व कामे आटोपून २८ तारखेपासून बारामतीत जाणार आहे. महायुतीचा घटकपक्ष म्हणून तिथं सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न करणं, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करून आम्ही सुनेत्रावहिनींचा विजय नक्कीच सोपा करू," असं काकडे यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, संजय काकडे यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांनंतर खरोखरच पवार कुटुंबातील सदस्यांचं मनोमिलन होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.