'घड्याळ' की 'तुतारी फुंकणारा माणूस', बारामतीकर कोणाला साथ देणार, मतदानासाठी प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 12:20 IST2024-05-06T12:19:06+5:302024-05-06T12:20:29+5:30
यंदा सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद भावजयमध्ये लढत होणार; बारामतीची निवडणूक देशात लक्षवेधी ठरणार

'घड्याळ' की 'तुतारी फुंकणारा माणूस', बारामतीकर कोणाला साथ देणार, मतदानासाठी प्रशासन सज्ज
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५१६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, आवश्यक साेयीसुविधा दिल्या आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती बारामती लाेकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. पुणे विधान भवन येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात रविवारी (दि. ५) पत्रकार परिषदेचे आयोजन केले हाेते.
द्विवेदी म्हणाल्या, मतदानासाठी १३ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साेमवारी (दि. ६) सकाळी आठ वाजता साहित्य वाटप सुरू हाेईल. तेथेच प्रशिक्षण दिल्यानंतर टीम साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना हाेतील. दि. ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान प्रक्रिया सुरू राहील. तत्पूर्वी पहाटे साडेपाच ते सात असे दीड तास माॅक पाेल घेतला जाईल. सेक्टर ऑफिसरकडे रिझर्व्ह ईव्हीएम दिले आहेत. निवडणुकीसाठी पुरेसा पाेलिस बंदाेबस्त प्राप्त झाला आहे. मतदानासाठी कामगारांना दोन तास पगारी सुटी द्यावी. जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करीत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
येथे शाेधा मतदान केंद्र आणि नाव
मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
बारामती लाेकसभा निवडणूक
एकूण मतदार : २३ लाख ७२ हजार
मतदान केंद्र : २ हजार ५१६
सर्वाधिक मतदान केंद्र : भाेर (५६१)
४१ ठिकाणी सहापेक्षा जास्त केंद्रांची संख्या
एकाच ठिकाणी सहा पेक्षा जास्त मतदान केंद्रांची संख्या ४१ आहे. त्यामध्ये सर्वाधिक २६ केंद्र खडकवासला विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यापाठाेपाठ पुरंदर- ८, दाैंड- ४ आणि इंदापूर, बारामती आणि भाेर मतदारसंघात प्रत्येकी एक केंद्र आहे.
मतदारांना ऊन लागू नये यासाठी शेडची सुविधा
दुपारी ऊन जास्त असल्याने मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी शेडची उभारणी केली असून, रांगेत खुर्ची ठेवणार आहाेत. प्रतीक्षा गृहासह पिण्याचे पाणी, ओआरएसची साेय केली आहे. सेक्टर ऑफिसरकडे मेडिकल किट दिल्या आहेत. मतदार ओळखपत्र नसेल तर ड्रायव्हिंग लायसेन्स, बँक पासबुक, पासपाेर्ट, आदी विविध १२ प्रकारचे शासकीय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
मतदान केंद्रांत माेबाईल बंदी
मतदान केंद्रात माेबाईल संच घेऊन जाता येणार नाही. अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील व्यक्तींना ताे स्वीच ऑफ करून ठेवावा लागेल. काेणी ईव्हीएम मशीनसह मतदान करतानाचे फाेटाे प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
आचारसंहिता भंगचे तीन गुन्हे
विनापरवानगी सभेचे आयाेजन केल्याप्रकरणी दाेन, तसेच एक शासकीय कर्मचाऱ्यावर एक असे एकूण ३ गुन्हे दाखल आहे.
१८ लाखांची राेख, ९७ लाखांची दारू जप्त
मतदारसंघात एकूण १८ लाखांची राेख रक्कम सापडली आहे. त्यात सर्वाधिक दाैंडमध्ये १४ लाखांचा राेख सापडली. तसेच ९७ लाखांची दारू जप्त केली आहे.
मतदारसंघात तीन संवेदनशील केंद्र
भाेर , इंदापूर आणि बारामती तालुक्यांत तीन संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मात्र, ते कायदा आणि सुव्यवस्था, तसेच धार्मिक दंगा यामुळे नाही तर आयाेगाची ७५ आणि ९० टक्के मतदानाची जी अटीमुळे संवेदनशील केंद्रात समावेश केला आहे.
मतदार यादीतून नावे गहाळप्रकरणी सातशे तक्रारी
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदार यादीत नाव नसल्याचा तक्रारी जास्त आहेत. खडकवासला मतदारसंघात ७०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध हाेते त्यावेळीच नाव नसेल तर त्याबाबत नागरिकांनी हरकत नाेंदविली पाहिजे.