बंडू खांदवे यांच्याशी वाद आमदारांना भोवला; बापूसाहेब पठारेंसह मुलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:28 IST2025-10-10T13:28:18+5:302025-10-10T13:28:43+5:30
लोहगाव परिसरात रस्त्यांची दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाविरोधात जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केल्यावर खांदवे आणि पठारे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती

बंडू खांदवे यांच्याशी वाद आमदारांना भोवला; बापूसाहेब पठारेंसह मुलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
लोहगाव : लोहगाव परिसरात रस्त्यांची दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाविरोधात जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बंडू शहाजी खांदवे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी वडगाव शेरीचेआमदार बापूसाहेब आणि त्यांची दोन्ही मुले सुरेंद्र पठारे, रविंद्र पठारे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चालकाच्या फिर्यादीनुसार विमानतळ पोलिस ठाण्यात बंडू खांदवे व कुटुंबीयांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेनंतर अखेर विमानतळ पोलिस ठाण्यात आमदार पठारे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू खांदवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॉन्समध्ये एका चकमक झाली. ४ ऑक्टोबरच्या रात्री लोहगावच्या गाथा लॉन्स येथे राजेंद्र भोसले (सुभेदार मेजर) यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी बंडू खांदवे उपस्थित होते. तेथेच रात्री सुमारे ९:२५ वाजता आमदार बापूसाहेब पठारे आपल्या फॉर्च्युनर गाडीतून आले. बंडू खांदवे यांनी फिर्यादीत म्हटले की, आप्पा (पठारे) माझ्याकडे ओरडून म्हणाले, मी तुला मेसेज पाठवला, पाहिला नाहीस का? तुला लई माज आलाय का? तुझा माज उतरवतो!’ आणि लगेचच त्यांनी मला शिवीगाळ करून हाताने मारहाण सुरू केली. यानंतर पठारे यांनी त्यांच्या ड्रायव्हर शकील शेख याला सांगितले. शकील, बेड्याला लई माज आलाय. याला आता जिवंत ठेवायचं नाही. गाडीतून दांडका घेऊन ये. त्यानंतर शकील शेख याने खांदवे यांच्या डोक्याच्या मागील भागावर दांडक्याने वार केल्याने ते खाली कोसळले. जिवे मारण्याची धमकी, सोन्याची चेन हिसकावली खांदवे यांच्या तक्रारीनुसार, पठारे यांचे नातेवाईक व समर्थक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते. त्यामध्ये महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, रवींद्र पठारे, किरण पठारे, सागर पठारे, सचिन पठारे यांचा समावेश होता.
यावेळी जमावातून घोषणा देण्यात आल्या. लोहगावकरांचा माज उतरवायचा आहे, बंडू खांदवेला जिवंत सोडायचं नाही!याच गोंधळात किरण बाळासाहेब पठारे यांनी खांदवे यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाची, सुमारे ३.५ लाख किमतीची सोन्याची चैन हिसकावली. खांदवे यांचे सोबती असलेले कार्यकर्ते भीतीपोटी पळून गेले आणि खांदवे यांचा जीव वाचला. घटनेनंतर घाबरलेल्या बंडू खांदवे यांनी तत्काळ तक्रार दिली नाही. पुढे ७ ऑक्टोबरला डोक्याला मार लागून उलट्या सुरू झाल्याने ते केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि डॉक्टरांच्या साक्षीने त्यांनी सविस्तर तक्रार नोंदवली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचा ड्रायव्हर शकील शेख आणि इतर समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे यांनी नोंदवली आहे.