आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 14:57 IST2024-04-25T14:57:18+5:302024-04-25T14:57:29+5:30
बारामतीत महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात

आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग
बारामती : बारामतीत लोकसभा निवडणुक शिगेला पोहचली आहे. अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. खासदार सुप्रिया सुळें यांच्या प्रचारासाठी त्यांची कन्या रेवती सुळे या गुरुवारी (दि २५) बारामतीत पोहचल्या. राजकारणापासुन दुर असणाऱ्या रेवती या प्रथमच निवडणुक प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे.
महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या मुलांनी आपल्या आईच्या प्रचारात तापत्या उन्हाची काळजी न करता सक्रीय सहभाग घेतला आहे. गुरुवारी(दि २५) बारामती शहरातील भिगवण चाैक, सुभाष चाैक, श्रीरामगल्ली, तालीम गल्ली, गालींदे गल्लीआदी ठीकाणी अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांची प्रचारफेरी पार पडली. यावेळी युगेंद्र यांच्यासमवेत रेवती या प्रचारात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी रेवती यांनी बारामतीकरांशी हात जोडून संवाद साधला. यापुर्वी मुलीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभा पवार यांनी शहरात काही दिवसांपुर्वी दोन दिवस कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या होत्या. आता सुळे यांची लेक देखील मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासाठी पार्थ आणि जय ही दोन्ही मुले प्रचाराची धुरा संभाळत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरी येथील प्रचार शुभारंभ सभेत त्यांचे सख्खे पुतणे यांच्यावर ‘काही जणांना आत्ताच आमदारकीची स्वप्ने पडत आहेत, अशी टीका केली होती. यावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमदारकीचे माझ्या मनात देखील नाही. मला आमदारकीची स्वप्ने पडत नाहीत. अजून मी आमदारकीचा विचार केलेला नाही. याबाबत घरातील सर्वांसमवेत चर्चा करुन निर्णय घेईन. ते वक्तव्य दादा सहज बोलून गेले. त्यांची सगळीच वक्तव्य गंभीर घ्यायची नसतात.